मालिकेत ०-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंड संघावर कमालीचे दडपण जाणवत आहे, अशी कबुली पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला सलामीवीर किटॉन जेनिंग्सने दिली. मात्र चौथ्या कसोटीत आम्ही भारताचा आत्मविश्वासाने सामना करू, असे मत जेनिंग्सने व्यक्त केले.

‘‘इंग्लंडवर दडपण नक्की आहे. मात्र दडपणाच्या प्रसंगीच स्वत:ला सिद्ध करण्याची खरी संधी असते, अशी शिकवण माझ्या वडिलांनी मला बालपणापासून दिली आहे. संघात सकारात्मक ऊर्जा टिकून आहे. याच बळावर मालिकेत परतू,’’ अशी अशा जेनिंग्सने प्रकट केली.

किटॉन हा प्रख्यात प्रशिक्षक रे जेनिंग्स यांचा मुलगा. रे जेनिंग्स हे जन्माने दक्षिण आफ्रिकन, मात्र नंतर त्यांनी स्थलांतर करून इंग्लंडचे प्रतिनिधित्वही केले. बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीद उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी जेनिंग्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय फिरकीच्या माऱ्याचा कशा प्रकारे सामना करशील, या प्रश्नाला उत्तर देताना जेनिंग्स म्हणाला, ‘‘या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काही दिवसांत मिळेलच. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. जर मी यशस्वी ठरलो, तर ते अभिमानास्पद असेल. जर मला अंतिम संघात स्थान मिळाले नाही, तर खेळाडूंना शीतपेये घेऊन जाण्याचे कार्य नक्की असेल. परंतु भविष्यात संधीसाठी मी आशावादी राहीन.’’

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मार्गदर्शन करणाऱ्या रे जेनिंग्स यांना भारतीय वातावरणाचा चांगला अभ्यास आहे. भारतातील मालिकेच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी मुलाला कानमंत्र दिले आहेत. याबाबत किटॉन म्हणाला, ‘‘माझे माझ्या वडिलांशी अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. खेळाच्या मैदानावर ते सदैव मला दिशादर्शन करतात. भारतातील खेळाची प्रक्रिया आणि संस्कृती याचा आनंद लूट, असाच सल्ला त्यांनी मला दिला. २००९-१०मध्ये आयपीएल स्पध्रेदरम्यान मी पर्यटक म्हणून वडिलांसोबत आलो होतो. आता पुन्हा या माझ्या आवडत्या ठिकाणी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करायला आलो आहे.’’