युमनाम सांथोई देवी आणि नरेंदर ग्रेवाल या वुशू खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. या दोन्ही खेळाडूंना मंगळवारी उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामुळेच त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.महिलांच्या ५२ किलो वजनी गटातील सांडा प्रकारामध्ये चीनच्या झँग लुआनने सांथोईला पराभूत केले, तर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील सांडा प्रकारात फिलिपाइन्सच्या जीन क्लाउड साकलॅगने ग्रेवालवर विजय मिळवला. २०१० साली गुआंगझाऊमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने वुशू खेळामध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली होती.

वेटलिफ्टिंग : वेटलिफ्टर्सचे स्वप्न भंगले
भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी मंगळवारीही निराशाच केली. पुरुषांमध्ये के. रवी कुमार आणि महिलांमध्यचे पूनम यादव यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ‘अ’ गटामध्ये ७७ किलो वजनी प्रकारामध्ये रवी कुमार अपयशी ठरला, त्यानंतर ‘ब’ गटामध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकावला असला तरी ‘अ’ गटातील निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे पदकांचे स्वप्न भंगले. रवी कुमारने १४१ आणि १७२ असे एकूण ३१३ किलो वजन क्लीन आणि जर्क प्रकारामध्ये उचलले. सतीश शिवलिंगमला या स्पर्धेत भाग घेता आला नाही. महिलांच्या ६३ किलो वजनी गटामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या पूनमला आशियाई स्पर्धेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पूनमने ९० आणि ११० असे एकूण २०० किलो वजन उचलले.

आजारपणामुळे सतीशची माघार

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सतीशकुमार शिवलिंगम याने ताप व घसा दुखावल्यामुळे येथील वेटलिफ्टिंग स्पर्धेतून माघार घेतली आहे. तो येथे ७७ किलो गटात भाग घेणार होता. ‘‘सोमवारपासूनच तो आजारी पडला आहे. सायंकाळी त्याचा ताप उतरला होता, मात्र पुन्हा येथे त्याच्या स्पर्धेपूर्वी सकाळीच त्याला पुन्हा ताप भरला. सतीशला विश्रांतीची गरज असून त्याने स्पर्धेत भाग घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला,’’ असे भारतीय संघाचे पथकप्रमुख आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.

जिम्नॅस्टिक : आशीष, दीपाचे आव्हान संपुष्टात
राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या आशीष कुमार आणि दीपा कर्माकर या दोन्ही जिम्नॅस्टिक खेळाडूंनी मंगळवारी साफ निराशा केली. पुरुषांमध्ये आशीषला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर दीपाला चौथा क्रमांक मिळाला. या पराभवाने भारताचे या खेळातील आव्हान संपुष्टात आले नसून या दोघांचेही आवडते क्रीडा प्रकार अजूनही बाकी आहेत.पोमेल हॉर्स, रिंग्स, पॅरलल बार्स आणि होरिझोंटल बार्स या प्रकारांमध्ये आशीष अपयशी ठरला, त्याने या स्पर्धेमध्ये ८१.७५० एवढे गुण कमावले, तर या गटात अव्वल स्थानावर आलेल्या जपानच्या कामोटोने ८७.९५० गुणांची कमाई केली. दीपाने प्रयत्नांची शर्थ केली असली तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. मंगळवारी या दोघांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी त्यांना पदक जिंकण्याची संधी अन्य एका प्रकारात नक्कीच आहे.

अश्वारोहण : श्रुती, नाडियाकडून निराशा
महिलांच्या अश्वारोहणामध्ये भारतीय महिलांकडून निराशाच झाली. श्रुती व्होरा आणि नाडिया हरिदास यांची स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. श्रुतीला आठव्या तर नाडियाला १५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सेपकटकराँ : भारताच्या दोन्ही संघांची हार
सेपकटकराँ क्रीडा प्रकारामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने सलामीलाच निराशा केली. जपानने भारतावर २-१ असा विजय मिळवला, तर म्यानमारने भारतावर ३-० असा आरामात विजय मिळवला. पुरुषांमध्ये भारताने पहिल्या टप्प्यात २१-१६ अशी आघाडी घेतली होती. परंतु नंतरचे दोन टप्पे १८-२१, १६-२१ अशा फरकाने गमावले. हा सामना दोन तास आणि २६ मिनिटे चालला.

रोइंग : भारतीय खेळाडू अंतिम फेरीत
भारतीय रोइंगपटूंनी मंगळवारी चमकदार कामगिरी केली. एकेरी, दुहेरी आणि चार सदस्यीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. एकेरीमध्ये सवर्ण सिंग विर्कने २००० मी. स्पर्धा ०७.१०.९३ मिनिटांमध्ये पूर्ण करत अव्वल क्रमांक पटकावला. दुहेरीमध्येही ओम प्रकाश आणि दत्तू बबन भोकानल यांनीही पहिले स्थान पटकावले. या दोघांनी ही स्पर्धा ०६.४०.७० मिनिटांमध्ये पूर्ण केली. चार सदस्यीय संघाने लाइटवेट गटामध्ये दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. या संघातील राकेश रालिया, विक्रम सिंग, सोनू लक्ष्मी नरेन आणि शोकेंदर तोमर यांनी ६.१३.९७ मिनिटांमध्ये स्पर्धेचे अंतर पार केले. चार सदस्यीय महिला संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

जलतरण : जलतरणपटू प्रभावहीन
भारतीय जलतरणपटूंची स्पर्धेतील निराशा अजूनही सुरूच आहे. मंगळवारी साजन प्रकाश, सौरभ सांगवेकर आणि अंशुल कोठारी यांना अपयशाचा सामना करावा लागला. ४०० मी. फ्री-स्टाइल प्रकारात साजनला चौथ्या आणि सौरभला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर ५० मी. फ्री-स्टाइल प्रकारात अंशुलने सहावे स्थान मिळवले.

सायकलिंग : देबोरोह आणि वर्गीस अपयशी
भारतीय सायकलपटूंची स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी सुरू असून देबोराह आणि के. वर्गीस यांनाही मंगळवारी अपयशाला सामोरे जावे लागले, त्यांना अनुक्रमे नववा आणि दहावा क्रमांक मिळाला. महिलांच्या पात्रता फेरीमध्ये देबोराह आणि वर्गीस यांनी अनुक्रमे १२.११८ आणि १२.८९७ या वेळेत स्पर्धा संपवली. चीनच्या तिआंशी झोंगने १०.७८० वेळेत स्पर्धा संपवत अव्वल स्थान पटकावले.