भारतात असंख्य गुणी अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर या गुणी खेळाडूंची पीछेहाट होताना दिसते. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि दुर्लक्ष करण्याचा दृष्टिकोन, ही या मागची कारणे आहेत. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अ‍ॅथलेटिक ट्रॅकची निर्मिती करत अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवू पाहणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी हक्काचे ठिकाण मिळवून दिले आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे उभारण्यात आलेला हा भारतातील पहिला मातीचा आंतरराष्ट्रीय ट्रॅक ठरला आहे. ५५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा ट्रॅक पुढील महिन्यापासून खेळाडूंसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ४०० मीटरचा हा ट्रॅक सात विविध खेळांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी सुविधा
या ट्रॅकवर पावसाचे पाणी अजिबात थांबणार नाही. त्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला. या ट्रॅकच्या आतील व बाहेरील बाजूने पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यातून पाणी हे बाहेरील भागात सोडले जाईल. तसेच आतील बाजूच्या दोन फूट रुंदीच्या जागेतून मदानावरील पाणी वाहून जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.

ट्रॅकची रचना
२० सेंटीमीटर जाडीचा मुरुम पसरवण्यात आला. त्यावर १० टन हायड्रोलिक रोलर फिरवण्यात आले. यावर १८ सेंटीमीटर जाडीचा मुरुम देण्यात आला. या थरावर ६ सेंटीमीटर विटांचा चुरा रचण्यात आला. यानंतर चाळलेला मुरुम आणि पोयटा मातीचा थर देण्यात आला.

खेळांच्या सुविधा
उंच उडी, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, गोळाफेक, स्टीपलचेस, हॉकी, फुटबॉल.

संरचना
वास्तुविशारद शिरीष बर्वे आणि राजाराम िदडे यांनी या ट्रॅकची निर्मिती केली आहे.

चांगले खेळाडू घडतील!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेऊन हा मातीचा ट्रॅक तयार केला आहे. असा पुढाकार घेणारे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. भविष्यात या प्रयत्नांतून चांगले खेळाडू निर्माण होतील.
– डॉ. दयानंद भक्त, क्रीडा संचालक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद.