२७ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी, कुस्तीपटूंची चार तर जलतरणपटूंचा तीन सुवर्ण
शिलाँग आणि गुवाहाटी या क्रीडा स्पर्धाच्या आयोजनात नव्याने समाविष्ट शहरांमध्ये आयोजित दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सलामीच्या दिवशीचा फॉर्म कायम राखत पदकांची लयलूट केली. पूर्वाचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीवर सर्वोत्तम कामगिरी करत भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण
वेटलिफ्टिंगपटू सरस्वती राऊत आणि संबो लापूंग व अजय सिंग यांनी सुवर्णपदक पटकावले. सरस्वतीने महिलांच्या ५८ किलो वजनी गटात एकूण १८७ किलो (८० किलो स्नॅच आणि १०७ किलो क्लिन व जर्क) वजन उचलले. बांगलादेशच्या फुल्लपटी चकमाने (१४४ किलो) रौप्य, तर श्रीलंकेचया मोहिदीन उमेरिआने (१४२ किलो) कांस्यपदक जिंकले. पुरुष गटात संबोने ६९ किलो वजनी गटात एकूण २८१ किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी केली. श्रीलंकेच्या एम. दिसनायकेला (२८१ किलो) आणि पाकिस्तानच्या सुफियान अबूला (२७५ किलो) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागल. अजय सिंगने पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात भारतासाठी तिसरे सुवर्ण निश्चित केले. त्याने ३०५ किलो वजन उचलले. श्रीलंकेच्या चिंथनाने (३०० किलो) रौप्य, तर पाकिस्तानच्या उमर रसूलने (२८१ किलो) कांस्यपदक पटकावले.
कुस्तीपटूंना चार सुवर्णपदक
दक्षिण आशियाई स्पध्रेत पाठवलेल्या कुस्तीपटूंच्या दुसऱ्या फळीने भारताला चार सुवर्णपदक पटकावून दिले. अमित धनकर (७० किलो फ्रीस्टाईल), प्रदीप (६१ किलो फ्रीस्टाईल), ममता (महिला ५३ किलो) आणि मंजु कुमारी (महिला ५८ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या गोपाळ यादवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शिलाँगमध्ये बोहनी
वाय. सपना देवी आणि अंजुल नामदेव यांनी वुशू प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकून शिलाँगमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले. महिलांच्या टाओलू (चँगक्युएन) प्रकारात सपना देवीने ९.४५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. नेपाळच्या सुस्मिता तमांगने ८.७२ गुणांची, तर पाकिस्तानच्या नाझिआ परवैझने ६.३० गुणांची
कमाई केली. त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात नामदेवने ८.६६ गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. नेपाळच्या बिजय सिंजली (८.८०) आणि पी.एल.एच. लक्षण (८.८६) यांना अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदकाची कमाई केली.
टेटे : भारताला जेतेपद
भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने अनुक्रमे श्रीलंका व पाकिस्तानला नमवून सुवर्णपदकाची कमाई केली.
भारतीय महिलांची विजयी सलामी
भारतीय महिला बॅडमिंटन संघाने ३-० अशा फरकाने नेपाळला पराभूत करून विजयी सलामी दिली. अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सारा देवी तमंगचा अवघ्या १५ मिनिटांत २१-२, २१-८ असा पराभव करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. १८ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू रुथविका शिवानी गद्देनेही १५ मिनिटांत नांगसाल तमंगचा २१-६, २१-२ असा पराभव करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीतील विजयानंतर सिंधू आणि अश्विनी पोन्नप्पा यांनी दुहेरीत सारा व नांगसाल या जोडीचा २१-१०, २१-८ असा पराभव करून ३-० असा विजय निश्चित केला. भारताच्या पुरुष संघाने अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव केला. अजय जयराम, एच. एस. प्रणॉय, अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा यांनी या विजयासह ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. जयरामने मोहम्मद कबीर मिर्झादचा २१-४, २१-४ असा, प्रणॉयने अहमद फहीम यारीचा २१-८, २१-११ असा पराभव केला़, तर दुहेरीत देवळकर व चोप्रा या जोडीने २१-९, २१-९ अशा फरकाने फहीम व इम्रान या जोडीवर कुरघोडी केली.
भारतीय स्क्वॉशपटू पराभूत
भारताच्या स्क्वॉशपटूंनी रविवारी निराशाजनक कामगिरी केली. भारताचे अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि हरिंदरपाल सिंग संधू यांना पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूंनी पराभूत केले. पाकिस्तानच्या फरहान झमानने अव्वल मानांकित सौरवला ११-४, ११-५, १०-१२, ११-५ असे पराभूत केले, तर संधूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने दुसऱ्या मानांकित नासीर इक्बालचा विजय निश्चित झाला. त्या सामन्यात नासीर ११-७, १२-१४, ११-७, ६-६ असा आघाडीवर होता. महिला गटात अव्वल मानांकित जोश्ना चिनप्पाने पाकिस्तानच्या सादीया गुलचा ११-९, ११-७, ११-५ असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारतीय महिलांकडून नेपाळचा धुव्वा
भारतीय महिला हॉकी संघाने दुबळ्या नेपाळवर २४-० असा दणदणीत विजय मिळवत स्पध्रेत दमदार सुरुवात केली. भारताकडून सौंदर्या येंडला (१५ मि., ५२ मि., ६२ मि. व ६४ मि.) व पूनम बार्ला (७ मि., ४२ मि., ४३ मि. व ५१ मि.) यांनी सर्वाधिक चार गोल नोंदवले. राणी (२ मि., ४६ मि. व ४८ मि.), जसप्रीत कौर (४ मि., ३५ मि. व ५६ मि.), नेहा गोयल (१४ मि., २२ मि. व ७७ मि.) आणि दीपिका (५३ मि., ६२ मि. व ६७ मि.) यांनी प्रत्येकी तीन गोल केले. गुरजित कौर (२१ मि. व ४१ मि.) आणि प्रीती दुबे (२३ मि. व २९ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात खारीचा वाटा उचलला. पुरुषांनीही ४-१ अशा फरकाने बांगलादेशला नमवले.

तिरंदाजांचा अचूक वेध
भारताच्या तिरंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना रिकव्‍‌र्ह व कम्पाऊंड सांघिक व मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी चार सुवर्ण आणि चार रौप्यपदक निश्चित करणाऱ्या भारतीय तिरंदाजांनी रविवारीही दबदबा कायम राखला. भारतासमोर रिकव्‍‌र्ह पुरुष व महिला गटाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचे आव्हान आहे. मिश्र रिकव्‍‌र्ह गटात तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी यांना बांगलादेशच्या तिरंदाजांचा सामना करावा लागेल, तर कम्पाऊंड गटात अभिषेक वर्मा आणि पुर्वशा शेंडे यांला पुढे चाल मिळाल्यामुळे अंतिम फेरीत ते बांगलादेशचा मुकाबला करतील. पुरुष गटात तरुणदीप राय व गुरुचरण बेस्रा या जोडीने भुटानचा ५-१ असा पराभव केला. महिला रिकव्‍‌र्ह संघात दीपिका, बोंबल्या देवी लैश्राम आणि लक्ष्मीराणी माझी यांनी भूतानचा ६-० असा पराभव केला. कम्पाऊंड पुरुष गटात अभिषेक, रजत चौहान आणि मनश ज्योती चांगमै यांनी २३३-२१५ अशा फरकाने नेपाळवर विजय मिळवला. कम्पाऊंड महिला गटात पुर्वशा शेंडे, ज्योती सुरेखा वेन्नम आणि लीली चानू पौमन यांना पुढे चाल मिळाली.

चार सुवर्णासह जलतरणात दहा पदके
* भारताच्या जलतरणपटूंनी वर्चस्व गाजवताना रविवारी चार सुवर्णासह दहा पदकांची कमाई केली. दिग्गज जलतरणपटू वीरधवल खाडेने पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने श्रीलंकेच्या मॅथ्यू अबेयसिंघेचा पराभव केला.
* वीरधवलचे स्पध्रेतील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. संदीप सेज्वलने दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरताना १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात १ मिनिट ०३.१४ सेकंदाची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रम केला. २०१० मध्ये संदीपने १ मिनिट ०५.०१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
* भारताच्या पुनीत राणाला रौप्य, तर श्रीलंकेच्या किरण जयसिंघेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात केरळच्या साजन प्रकाशने १५ मिनिटे ५५.३० सेकंदाची वेळ नोंदवून पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.
* ४०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सयानी घोषने ०५ मिनिटे १४.५१ सेकंदासह सुवर्ण, तर श्रद्धा सुधीरने ०५ मिनिटे २३.३२ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. श्रीलंकेच्या जे. सिल्वाने (०५:४४.२०) कांस्यपदक पटकावले. २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात एम. अरविंदने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मन्ना पटेलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १०० मीटर महिला ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात चाहत अरोराला कांस्यवर समाधान मानावे लागले.