अ‍ॅथलेटिक्सपटूंची १२ पैकी ११ सुवर्णपदकांवर मोहर; नेमबाजी, टेनिसमध्ये निर्भेळ यश
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील गुरुवारचा दिवस अ‍ॅथलेटिक्सपटूंनी गाजवला. १२ पैकी ११ सुवर्णपदकांवर मोहर उमटवत अ‍ॅथलेटिक्सपटूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचा इशाराच जणू दिला. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्र उत्तेजकांच्या विळख्यात असताना भारतीय खेळाडूंनी मिळवलेले यश सकारात्मक वाटचाल करणारे आहे. अन्य खेळांमध्ये टेनिसपटू आणि नेमबाजांनी निर्भेळ यश साकारत वर्चस्व गाजवले. धवल यशासह भारताने पदकांचे द्विशतक साजरे केले. २३७ पदकांसह भारत पदकतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताच्या नावावर १३९ सुवर्ण, ७८ रौप्य आणि २० कांस्यपदके आहेत.
अ‍ॅथलेटिक्स
सुमन देवी (भालाफेक), रंजीत महेश्वरी (तिहेरी उडी), ओम प्रकाश कऱ्हाना (गोळाफेक), पी.यू. चित्रा (१५०० मीटर शर्यत), अजॉय कुमार सरोज (१५०० मीटर शर्यत), जौना मुरुमू (४०० मीटर अडथळा शर्यत), धारुन अय्यासामी (४०० मीटर अडथळा शर्यत), एल. सूर्या (१०,००० मीटर), स्रबनी नंदा (२०० मीटर शर्यत) यांच्यासह पुरुष त्आणि महिला रिले संघांनी सुवर्णपदकावर कब्जा केला. भालाफेक प्रकारात सुमन देवीने ५९.४५ मीटर अंतरावर भाला फेकण्याची किमया साधली. अन्नू राणीचा राष्ट्रीय विक्रम अवघ्या आठ सेंटीमीटरने हुकला. अन्नू राणीने ५७.१३ मीटर अंतरासह रौप्यपदक मिळवले. महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत एल. सूर्याने शानदार दौड लगावताना अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने रौप्यपदक पटकावले. तिहेरी उडी प्रकारात रंजीत महेश्वरीने १६.४५ अंतरावर उडी मारत सुवर्णपदकावर कब्जा केला. दक्षिण आशियाई स्पर्धेतला हा विक्रम आहे. जयकुमार सुरेंदरने रौप्यपदक मिळवले. आशियाई पदक विजेता इंद्रजीत सिंगच्या अनुपस्थितीत ओमप्रकाश सिंग कऱ्हानाने गोळाफेक प्रकारात १८.४५ मीटर अंतरासह सुवर्णपदकाची कमाई केली.

टेनिस
रामकुमार रामनाथनने साकेत मायनेनीवर ७-५, ६-३ असा विजय मिळवत पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरीत प्रार्थना ठोंबरे व शार्मदा बालुशिका जोडीने रिशिका सुनकारा व नताशा पाल्हा जोडीवर ७-५, २-६, १०-४ अशी मात करत सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी टेनिसमधील पाचही प्रकारांतील सुवर्ण व रौप्यपदकांवर नाव कोरले.

फुटबॉल
गतविजेत्या भारतीय संघाला नेपाळविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले. बरोबरीसह नेपाळने दोन विजय आणि दोन लढती बरोबरीत सोडवत सात गुणांसह अंतिम फेरी गाठली. भारतीय संघाचे पाच तर बांगलादेशचे सहा गुण झाले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील विजेत्या संघाचा अंतिम लढतीत नेपाळशी सामना होणार आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने नेपाळवर ३-० असा विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी नेपाळला मिळू शकते. या लढतीत भारताची प्रमुख आघाडीपटू ग्रेस दंगमेईला दुखापत झाली. ३३व्या मिनिटाला गोल करण्याच्या प्रयत्नात ग्रेसला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारांसाठी स्ट्रेचरच्या माध्यमातून तिला मैदानाबाहेर न्यावे लागले. सातत्याने गोल करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध ग्रेस दुखापतग्रस्त झाल्याने नेपाळविरुद्ध भारताच्या आशा मावळल्या.

हॉकी
भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा १०-० असा धुव्वा उडवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. राणीने तीन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एदंल्लाने दोन गोल केले. पुरुष विभागत दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाचा अंतिम फेरीत मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने बांगलादेश आणि श्रीलंका संघांवर विजय मिळवला, मात्र पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वरिष्ठ खेळाडू जागतिक हॉकी लीग स्पर्धेत खेळत असल्याने भारतीय संघ कमकुवत झाला आहे.

कबड्डी
भारतीय महिला संघाने नेपाळचा ५१-१७ असा धुव्वा उडवून सलामी नोंदवली. पहिल्या सत्रातच भारताने ३२-६ आघाडी घेत आपल्या वर्चस्वाची चुणूक दाखवली होती. दुसऱ्या सत्रात भारताने खेळ धिमा केला. तेजस्विनी बाई भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिला अभिलाषा म्हात्रे आणि स्नेहल शिंदे यांनी छान साथ दिली. प्रतिस्पर्धी अफगाणिस्तानचा संघ स्पध्रेत सहभागी होऊ न शकल्यामुळे पुरुषांमध्ये भारताचा सामना होऊ शकला नाही.

नेमबाजी : पाच प्रकारांत सुवर्णपदके
भारतीय नेमबाजांनी पाचही प्रकारांत सुवर्णपदकांसह निर्भेळ यश मिळवले. कुहेली गांगुलीने सुवर्ण, लज्जा गोस्वामीने रौप्य तर अनुजा जंगने कांस्यपदक पटकावले. कुहेली, लज्जा आणि अनुजा या त्रिकुटाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. चैन सिंग, गगन नारंग आणि सुरेंद्र सिंग राठोड यांनी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवले. २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात पेंबा तमांग, विजय कुमार आणि समरेश जंग या त्रिकुटाने सुवर्णपदक पटकावले. समरेशने वैयक्तिक प्रकारात ५८० गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.