जागतिक क्रमवारीतील  पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान असलेल्या खेळाडूंखेरीज भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस लढतीत चांगली कामगिरी करू शकणार नाही, असे ज्येष्ठ टेनिसपटू व संघटक विजय अमृतराज यांनी सांगितले.
भारतीय संघास येथे १८ ते २० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीत चेक प्रजासत्ताक संघाशी सामना खेळावा लागणार आहे. या सामन्यासाठी भारताची मुख्य मदार सोमदेव देववर्मनवर आहे. चेक प्रजासत्ताक संघात बलाढय़ खेळाडूंचा समावेश असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
या लढतीविषयी अमृतराज म्हणाले की, ‘‘एकेरीत अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा अभाव असल्यामुळे या स्पर्धेतील भारताची प्रगती खुंटली आहे. लिअँडर पेस जरी खेळला तरी तो दुहेरीत विजय मिळवून देईल. एकेरीत मात्र बलाढय़ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताची बाजू कमकुवत आहे. दुहेरीबाबत आपल्याला चिंता वाटत नाही. एकेरीतील अव्वल दर्जाच्या खेळाडूंकरिता भारतीय संघटकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पहिल्या १०० खेळाडूंमध्येही भारतीय खेळाडू नाहीत ही अतिशय शोकांतिका आहे.’’
‘‘डेव्हिस चषक लढतीत एकेरीचे चार सामने असतात. हे लक्षात घेता पहिल्या दिवशी त्यापैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. आम्ही या स्पर्धेत अनेक सामन्यांमध्ये आश्चर्यजनक कामगिरी केली ती एकेरीतील सनसनाटी विजयाच्या जोरावरच. त्यामुळेच मी एकेरीच्या सामन्यांना अधिक प्राधान्य देता,’’ असेही अमृतराज यांनी सांगितले.
भारताचा युकी भांब्री हा जागतिक क्रमवारीत १४५ व्या स्थानावर आहे तर सोमदेव याला १५२ वे स्थान आहे. या खेळाडूंविषयी अमृतराज म्हणाले, युकी, सोमदेव यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती आहे. असे असूनही पहिल्या १०० खेळाडूंमध्ये ते स्थान मिळवू शकत नाहीत याचीच खंत मला वाटत आहे. या खेळाडूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव आहे.
सानिया मिर्झाच्या कामगिरीचे कौतुक करीत अमृतराज म्हणाले, कारकिर्दीत अनेक समस्यांना तोंड देत तिने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारापर्यंत झेप घेतली आहे. तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तिने अधिकाधिक एकेरीच्या सामन्यांमध्ये भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे.
नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर व रॅफेल नदाल यांच्याशिवाय ग्रँड स्लॅम स्पर्धा पूर्ण होऊच शकत नाहीत. ते खरोखरीच महान खेळाडू आहेत असेही अमृतराज यांनी सांगितले.