घरच्या मैदानावर व प्रेक्षकांच्या पाठिंबा याचा फायदा घेत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची भारताकडे क्षमता आहे, असे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपक ठाकूर यांच्यासह अनेक खेळाडूंनी मत व्यक्त केले. भारताने २००१ मध्ये कनिष्ठ गटाचे विजेतेपद मिळविले होते. या विजेतेपदामध्ये ठाकूर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी दहा गोल करीत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला होता, तर देवेश चौहान यांनी सवरेत्कृष्ट गोलरक्षकाचे पारितोषिक मिळविले होते. लखनौ येथे ८ ते १८ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

ठाकूर यांनी सांगितले, ‘‘२००१ मध्ये आम्ही विजेतेपद मिळविले याबाबत अजूनही विश्वास बसत नाही. अर्थात त्या वेळी वैयक्तिक सर्वोत्तम नैपुण्य व सांघिक समन्वयाच्या जोरावर आम्हाला हे यश मिळविता आले होते. आम्ही खेळाच्या प्रत्येक आघाडीवर सर्वोच्च कामगिरी केली. भारताला विजेतेपद मिळविण्याची हुकमी संधी आहे. मात्र त्यांनी शेवटपर्यंत सकारात्मक व आत्मविश्वासाने खेळले पाहिजे.’

माजी कर्णधार राजपालसिंग यांनी सांगितले, ‘‘२००१ मध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या संघातील अठरावा खेळाडू म्हणून मला संधी मिळाली होती. या स्पर्धेतील अनुभवामुळेच वरिष्ठ गटातही चांगली कारकीर्द घडू शकली. प्रत्यक्ष स्पर्धा होबार्ट येथील खूप थंड वातावरणात झाल्या होत्या.   अर्थात आम्ही पहिल्या दिवसापासूनच विजेतेपद मिळविण्याचे ध्येय ठेवीत खेळलो.’