‘दैव देतं अन् कर्म नेतं’ याचा प्रत्यत भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. खडतर परिस्थितीतून चिवट, झुंजार खेळी करून पराभव टाळण्यासाठी जिवाचे रान करायचे आणि विजय दृष्टिक्षेपात आला की नांगी टाकायची, ही भारतीय संघाची वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली. मुरली विजय आणि विराट कोहली यांच्या सुरेख फलंदाजीमुळे पहिल्या कसोटीत हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सुमार फटकेबाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या तोंडात भरवला. भारताच्या शेवटच्या आठ विकेट्स अवघ्या ७३ धावांत मिळवत ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी एकही चेंडू न खेळता दुसरा डाव ५ बाद २९० धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाचे ३६४ धावांचे उद्दिष्ट पेलताना विजय (९९) आणि कोहली यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय संघ २ बाद २४२ अशा भक्कम स्थितीत होता. कोहलीने दुसऱ्या डावातही शतकी खेळी केल्यामुळे भारताने विजयाच्या दिशेने कूच केली होती, पण मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताला विजयावर पाणी सोडावे लागले. कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतके झळकावणारा विराट कोहली हा विजय हजारे यांच्यानंतरचा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला. याआधी हजारे, सुनील गावस्कर (तीन वेळा) आणि राहुल द्रविड (दोन वेळा) आणि आता कोहली यांनी भारताकडून एका सामन्यात दोन शतके झळकावण्याची करामत केली आहे. ऑफस्पिनर नॅथन लिऑनने भारताच्या डावाला सुरुंग लावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. लिऑनने सात फलंदाजांना माघारी पाठवत भारताचा दुसरा डाव ३१५ धावांवर संपुष्टात आणला.

सलामीवीर शिखर धवन (९) आणि चेतेश्वर पुजारा (२१) लवकर बाद झाल्यानंतर विजय आणि कोहलीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी रचत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव लवकर घोषित करण्याची घाई केली का, अशी चर्चा रंगू लागली. मुरली विजयला मात्र नशिबाने साथ दिली नाही. कसोटीत पाचवे शतक झळकावण्याचे त्याचे स्वप्न एका धावेने अधुरे राहिले. लिऑनने त्याला ९९ धावांवर पायचीत पकडले. पहिल्या डावात शतक साकारणाऱ्या कोहलीने सुरेख फॉर्म कायम राखत दुसऱ्या डावातही शतक साजरे केले. त्यामुळे या कसोटीत डेव्हिड वॉर्नर आणि कोहली यांची प्रत्येकी दोन शतके पाहण्याची संधी चाहत्यांना लाभली. विजय बाद झाल्यानंतर लिऑनने भारताच्या डावाला खिंडार पाडले. अजिंक्य रहाणेला (०) पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिले. लिऑनच्या गोलंदाजीवर ख्रिस रॉजर्सने रहाणेचा शॉर्टलेगला झेल पकडला, पण चेंडू बॅटला स्पर्श करून न गेल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे जाणवत होते. रोहित शर्मा (६) आणि वृद्धिमान साहा (१३) यांनी चुकीची फटकेबाजी करीत आपली विकेट गमावली. त्यामुळे १८ षटकांत ६२ धावा हव्या असताना  कोहलीने अखेपर्यंत किल्ला लढवणे अपेक्षित होते, पण त्यालाही मोठी फटकेबाजी करण्याचा मोह आवरला नाही. कोहलीने १७५ चेंडूंत १६ चौकार १ षटकारासह १४१ धावांची खेळी साकारली, पण कोहली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताचे उर्वरित तीन बळी झटपट मिळवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७ बाद ५१७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) : सर्व बाद ४४४
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ६९ षटकांत ५ बाद २९० (डाव घोषित)
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय पायचीत गो. लिऑन ९९, शिखर धवन झे. हॅडिन गो. जॉन्सन ९, चेतेश्वर पुजारा झे. हॅडिन गो. लिऑन २१, विराट कोहली झे. मार्श गो. लिऑन १४१, अजिंक्य रहाणे झे. रॉजर्स गो. लिऑन ०, रोहित शर्मा झे. वॉर्नर गो. लिऑन ६, वृद्धिमान साहा त्रि. गो. लिऑन १३, कर्ण शर्मा नाबाद ४, मोहम्मद शमी झे. जॉन्सन गो. हॅरिस ५, वरुण आरोन पायचीत गो. जॉन्सन १, इशांत शर्मा यष्टिचीत हॅडिन गो. लिऑन १, अवांतर १५ (बाइज-५, लेगबाइज-८, वाइड-२), एकूण : ८७.१ षटकांत सर्व बाद ३१५.
बाद क्रम : १-१६, २-५७, ३-२४२, ४-२४२, ५-२७७, ६-२९९, ७-३०४, ८-३०९, ९-३१४, १०-३१५.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन १६-२-४५-२, रयान हॅरिस १९-६-४९-१, नॅथन लिऑन ३४.१-५-१५२-७, पीटर सिडल ९-३-२१-०, शेन वॉटसन २-०-६-०, स्टीव्ह स्मिथ ३-०-१८-०, मिचेल मार्श ४-१-११-०.
सामनावीर : नॅथन लिऑन.