‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी.. हम हिंदुस्तानी..’ हे गाणे सत्यात अवतरल्याची साक्ष भारतीय फलंदाजांनी मोटेरावर दिली. इंग्लिश भूमीवर ४-० अशा फरकाने सपाटून मार खाणारा भारतीय संघ आता त्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी सज्ज झाला आहे. हाच विश्वास भारताच्या खेळातून व्यक्त होत होता. राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये तासन्तास उभे राहून दीर्घ खेळी साकारण्याची कुवत आपल्यातही आहे, याची झलक चेतेश्वर पुजाराने दिली. कसोटी कारकीर्दीमधील पहिलेवहिले द्विशतक साकारून पुजाराने भारताला पहिल्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी तीन इंग्लिश फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली आहे.
२४ वर्षीय पुजाराने नाबाद २०६ धावांची यादगार खेळी साकारताना तब्बल नऊ तास खेळपट्टीवर टिकाव धरला. त्यामुळेच चहापानानंतर यजमानांनी ८ बाद ५२१ अशा समाधानकारक धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ४१ अशी केविलवाणी अवस्था झाली. खेळ थांबला तेव्हा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक (२२) आणि केव्हिन पीटरसन (६) हे दोन फलंदाज खेळत होते. इंग्लंडला फॉलो-ऑन टाळण्यासाठी अजून २८१ धावांची आवश्यकता आहे. सरदार पटेल स्टेडियमची खेळपट्टी आता फिरकीला चांगलीच साथ देऊ लागली आहे. निक कॉम्प्टन (९), जेम्स अँडरसन (२) आणि जोनाथन ट्रॉट (०) हे भरवशाचे इंग्लिश फलंदाज तंबूत परतले आहेत.
पुजाराचा हा सहावा कसोटी सामना. पण त्याने दुसरे शतक साकारताना खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी दणकेबाज फटके खेळून आपला दर्जा दाखवून दिला. पुजाराने ५१३ मिनिटे आणि ३८९ चेंडूंचा सामना करीत २१ चौकारांसह आपली खेळी उभारली. याचप्रमाणे कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतणाऱ्या युवराज सिंगनेही आपले पुनरागमन झोकात साजरे केले. त्याने ७४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पुजारा आणि युवराज यांनी पाचव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचली. परंतु त्यानंतर कप्तान महेंद्रसिंग धोनी (५), आर. अश्विन (२३) आणि झहीर खान (७) फार काळ तग धरू शकले नाही. ऑफ-स्पिनर ग्रॅमी स्वान सर्वात यशस्वी इंग्लिश गोलंदाज ठरला. ५१-८-१४४-५ असे पृथक्करण राखणाऱ्या स्वानने कारकीर्दीत १४व्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली.    
अब तक ५१!
ऑफ-स्पिनर आर. अश्विनने भारताच्या गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने दिवसअखेर दोन बळी घेत फक्त नवव्या कसोटी सामन्यातच ५० बळींचा टप्पा गाठला. हा टप्पा कमी सामन्यांत गाठण्याचा पराक्रम त्याने केला आहे. याआधी अनिल कुंबळेने दहाव्या सामन्यात हा टप्पा गाठला होता.
पुजारा १९वा भारतीय द्विशतकवीर
चेतेश्वर पुजारा आता कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या अन्य १८ भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. तब्बल दोन वर्षांनी हे भारतीय फलंदाजाने झळकावलेले द्विशतक ठरले आहे. २०१०मध्ये सचिन तेंडुलकरने बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१४ धावांची खेळी साकारली होती. इंग्लिश संघाविरुद्ध द्विशतक झळकावणारा पुजारा सहावा फलंदाज ठरला आहे. मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, विनोद कांबळी आणि राहुल द्रविड या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध द्विशतके साकारली आहेत.
धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर त्रिफळा गो. स्वान ४५, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. स्वान ११७, चेतेश्वर पुजारा नाबाद २०६, सचिन तेंडुलकर झे. पटेल गो. स्वान १३, विराट कोहली त्रिफळा गो. स्वान १९, युवराज सिंग झे. स्वान गो. पटेल ७४, महेंद्रसिंग धोनी त्रिफळा गो. स्वान ५, आर. अश्विन झे. प्रायर गो. पीटरसन २३, झहीर खान झे. ट्रॉट गो. अँडरसन ७, प्रग्यान ओझा नाबाद ०, अवांतर १२, एकूण १६० षटकांत ८ बाद ५२१ (डाव घोषित).
बाद क्रम : १-१३४, २-२२४, ३-२५०, ४-२८३, ५-४१३, ६-४४४, ७-५१०, ८-५१९.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २७-७-७५-१, स्टुअर्ट ब्रॉड २४-१-९७-०, टिम ब्रेसनन १९-२-७३-०, ग्रॅमी स्वान ५१-८-१४४-५, समित पटेल ३१-३-९६-१, केव्हिन पीटरसन ८-१-२५-१.
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक २२, निक कॉम्प्टन त्रिफळा गो. अश्विन ९, जेम्स अँडरसन झे. गंभीर गो. ओझा २, जोनाथन ट्रॉट झे. पुजारा गो. अश्विन ०, केव्हिन पीटरसन खेळत आहे ६, अवांतर २, एकूण १८ षटकांत ३ बाद ४१
बाद क्रम : १-२६, २-२९, ३-३०
गोलंदाजी : आर. अश्विन ८-१-२१-२, झहीर खान ५-३-६-०, प्रग्यान ओझा ४-१-३-१, युवराज सिंग १-०-९-०.    
सराव सामन्यातील हुकलेल्या शतकाने प्रेरणा दिली -पुजारा
अहमदाबाद : सराव सामन्यात हुकलेल्या शतकाने मला प्रेरणा दिली. त्यामुळेच पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मला शतक साकारता आले, अशी प्रतिक्रिया द्विशतकवीर चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली. ‘‘मुंबई ‘अ’ संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळताना मी ८७ धावांवर बाद झालो. त्याच खेळीमुळे मला शतकाची आणि मग द्विशतकाची प्रेरणा दिली,’’ असे पुजाराने सांगितले. सौराष्ट्रचा २४ वर्षीय फलंदाज पुजारा म्हणाला की, ‘‘मी त्या सामन्यात ग्रॅमी स्वान वगळता सर्व गोलंदाजांना सामोरा गेलो होतो. मी स्वानच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये निरीक्षण केले. मग सर्वच गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळलो,’’ असे पुजारा म्हणाला.
राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करीत पुजाराने आपली मोहोर उमटवली. याबाबत पुजारा म्हणाला की, ‘‘वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे ही मोठी जबाबदारी असते. नव्या चेंडूला बऱ्याचदा त्याला सामोरे जावे लागते.’’  द्रविडनेही एसएमएस पाठवून आपले अभिनंदन केल्याचे पुजाराने यावेळी सांगितले.   
कुक, पीटरसन यांच्याकडे मोठी शतके साकारण्याची क्षमता -पटेल
अहमदाबाद : कप्तान अ‍ॅलिस्टर कुक, केव्हिन पीटरसन आणि इयान बेल यांच्याकडे मोठी शतकी खेळी साकारण्याची आणि उर्वरित तीन दिवसांत कसोटी वाचविण्याची क्षमता आहे, असा आत्मविश्वास इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू समित पटेलने व्यक्त केला आहे. ‘‘सध्या मैदानावर जागतिक दर्जाचे फलंदाज खेळत आहेत. बेल अद्याप खेळायचा बाकी आहे,’’ असे पटेलने सांगितले. ‘‘कधीतरी फलंदाजांना श्रेय द्यायला हवे. सेहवागने गुरुवारी धडाकेबाज खेळी साकारली. पुजाराने दोन दिवस खेळून आपली द्विशतकी खेळी उभारली, तर युवराजही चांगला खेळला. फिरकी गोलंदाजी ते चांगली खेळून काढतात, हे आम्हाला माहीत आहे,’’ असे पटेल यावेळी म्हणाला.