* महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेकडून शुभारंभ
* आठ पदकांची कमाई
दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचेही नाव उंचावले. महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने ५५ किलो वजनी गटामध्ये पहिले सुवर्णपदक पटकावत तिरंगा फडकवला. त्यानंतर भारताने एकूण चार सुवर्णपदकांसह आठ पदकांची कमाई केली. यामध्ये तीन रौप्यपदकांसह दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या फिजिक आणि फिटनेस विभागात मुंबईच्या अनुप सिंगने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. महाराष्ट्राच्या सागर जाधवनेही या वेळी रौप्यपदकाची कमाई केली.
जवळपास ५०० स्पर्धक आणि ४५ देशांच्या सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने नेत्रदीपक कामगिरी करत देशाचे नाव अभिमानाने उंचावले. ५५ किलो वजनी गटात नितीनच्या सुवर्णपदकानंतर भारताला काही वेळ पदकासाठी वाट पाहावी लागली. भारताच्या ममता देवीने ५५ किलोवरील वजनी गटातील शरीरसौष्ठव प्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. मुंबईच्या श्वेता राठोरला फिजिक आणि फिटनेस स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला आणि तिचे पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या रबितादेवी ५५ किलो वजनी गटातील शरीरसौष्ठव प्रकारात चौथा आणि महिलांच्या कनिष्ठ फिटनेस आणि फिजिक या प्रकारात सोनिया मित्राला पाचवा क्रमांक मिळाला.
महिलांमध्ये भारताला एक पदक मिळाले असले तरी पुरुषांनी मात्र निराशा केली नाही. ७० किलो वजनी गटात नायक राजकिशोरला रौप्य आणि रोमी सिंगला कांस्यपदक मिळाले. भारताच्या मोठय़ा आशा असलेल्या रॉबी मैतेयीने या वेळी अपेक्षापूर्ती केली. यापूर्वी त्याने आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते आणि या वेळीही त्याने भारताला सोनेरी कमाई करून दिली.
भारताचा अनुभवी शरीरसौष्ठवपटू बॉबी सिंगने पुन्हा एकदा भारताच्या पदरात पदकाचे दान टाकले. ८० किलो वजनी गटामध्ये बॉबीने सुवर्णपदक पटकावले, तर या गटामध्येच यतिंदर सिंगने रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या सागर जाधवने १०० किलो वजनी गटामध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
मुंबईच्या अनुपने जोधा-अकबर या सिनेमातील ‘अजिमो ओ शान शहेनशहा’ या गाण्यावर चाहत्यांना ताल धरायला लावला.

भारताची पहिली जोडी जागतिक स्पर्धेत
भारताकडून या वेळी पहिल्यांदाच पती आणि पत्नी एकत्रितपणे जागतिक स्पर्धेत उतरले होते. मणिपूरचे ममता देवी आणि बोरून येमनाम यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ममता देवीला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले, तर बोरूनला ८० किलो वजनी गटामध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.