भारतीय खेळपट्टय़ांच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ा खूपच वेगळ्या आहेत. त्यावर भारतीय गोलंदाज किती प्रभाव दाखवितात यावरच भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत व त्यानंतरच्या एक दिवसीय सामन्यांच्या तिरंगी स्पर्धेतही भारतीय गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत त्यांची खडतर परीक्षाच आहे.
आपल्या संघाने २०११मध्ये विश्वचषक जिंकला, त्यामध्ये भारतीय उपखंडातील विशेषत: आपल्या देशातील अनुकूल खेळपट्टय़ांचा महत्त्वाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियात ताशी १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला तरीही त्यावर खणखणीत फटके मारले जातात हे सिद्ध झाले आहे. तेथील वातावरणात स्विंग गोलंदाजी अधिक यशस्वी ठरते हे मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क यांनी दाखवून दिले आहे. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार या आपल्या गोलंदाजांनी स्विंगवर अधिक भर दिला पाहिजे. रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी केली पाहिजे. स्टुअर्ट बिन्नी याच्याकडे माजी कसोटीपटूचा मुलगा म्हणून न पाहता उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले तर त्याचे महत्त्व कळू शकेल. तो या स्पर्धेत आपली उपयुक्तता सिद्ध करील अशी मला खात्री आहे.
भारताच्या फलंदाजीबाबत मला फारशी काळजी वाटत नाही. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यापैकी दोन फलंदाज संघाला आश्वासक धावसंख्या रचून देण्यात तरबेज आहेत. अर्थात रोहित हा लवकर तंदुरुस्त होवो अशीच माझी परमेश्वरास प्रार्थना आहे. कारण तेथील खेळपट्टय़ा त्याच्या शैलीला पूरक आहेत. शिखर धवनने थोडासा संयम ठेवत खेळले पाहिजे.
विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस राहील असे माझे मत आहे. त्यांच्याबरोबर उपांत्य फेरीसाठी श्रीलंका, न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील एक संघ येण्याची शक्यता आहे. आफ्रिकेला ‘चोकर’ असे उपहासाने म्हटले जात असले तरी त्यांच्या अब्राहम डी’व्हिलियर्स, हशिम अमला यांचा सध्याचा ‘फॉर्म’ पाहता ते यंदाचे प्रबळ दावेदार आहेत. कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांच्या खेळातील सातत्य हाच लंकेचा मुख्य आधार असेल. न्यूझीलंडला घरच्या मैदानावर व वातावरणात खेळण्याचा फायदा मिळणार असला तरी अंतिम फेरीसाठी त्यांना झगडावे लागेल. पाकिस्तानचा संघ समतोल असला तरी त्यांना बाद फेरीसाठीच खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. एकूणच ही स्पर्धा अतिशय रंगतदार होणार आहे.

सुरेंद्र भावे, राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य

शब्दांकन : मिलिंद ढमढेरे