आज ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी ट्वेन्टी-२० लढत

एकदिवसीय मालिका गमावली असली तरी ट्वेन्टी-२० मालिका खिशात टाकल्यावर आता निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद शेन वॉटसनला देण्यात आले असून तो संघाला विजय मिळवून देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

विराट कोहलीने या मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर रोहित शर्माही चांगल्या फॉर्मात आहे. पण संघात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगला अजूनही फलंदाजीची संधी मिळालेली नाही. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या मालिकेत आपली छाप पाडली आहे. भारताने मालिका जिंकली असल्यामुळे या सामन्यात आतापर्यंत दौऱ्यात फक्त पर्यटक ठरलेल्या खेळाडूंना संधी मिळते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

आरोन फिंचला दुखापत झाल्याने वॉटसन संघाचे नेतृत्व करत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नावाजलेल्या खेळाडूंना या मालिकेत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्यांच्याकडून झोकात पुनरागमन करण्याची अपेक्षा असेल.