उत्कंठापूर्ण लढतीत भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने स्पेनवर ३-२ अशी मात केली आणि पाच देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील आव्हान राखले.

भारत व स्पेन या दोन्ही संघांनी सुरुवातीपासून जोरदार चाली केल्या, मात्र बराच वेळ गोलफलक कोराच होता. अखेर १५व्या मिनिटाला क्लारा युकार्ट हिने गोल करीत स्पेनला आघाडी मिळवून दिली. मात्र २८व्या मिनिटाला ज्योती कुमारीने भारताकडून गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात हीच बरोबरी कायम होती. सामन्याच्या उत्तरार्धात भारताच्या रितूने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तथापि, त्यांना या आघाडीचा आनंद फार वेळ घेता आला नाही.

दोनच मिनिटांनी क्लाराने स्पेनचा व स्वत:चा दुसरा गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु शेवटच्या १० मिनिटांपर्यंत ही बरोबरी कायम होती. ही कोंडी फोडताना भारताच्या संगीता कुमारीने अप्रतिम गोल करीत संघाचा विजयी गोल नोंदवला. भारताची गुरुवारी जर्मनीबरोबर लढत होणार आहे.