झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रीय निवड समितीची बैठक सोमवारी नवी दिल्लीमध्ये होत आहे.
धोनी आणि कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा किंवा सुरेश रैना यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. यंदा मुंबई इंडियन्सला आयपीएल विजेतेपद जिंकून देणाऱ्या रोहितच्याच नावावर मोहोर उमटली जाण्याची शक्यता आहे. रैनाने याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये थोडय़ा काळासाठी नेतृत्व भूषवले आहे. शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणेचा संघात समावेश होऊ शकेल. १० जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली आणि आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
भारतीय संघ सलग सात महिने क्रिकेट खेळत असून, नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत या संघाने १-२ असा मानहानीकारक पराभव पत्करला.

‘‘अश्विन आणि कोहली क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये खेळत आहेत. तर ऑस्ट्रेलिया दौरा, विश्वचषक आणि आयपीएल अशी एकपाठोपाठ एक आव्हाने धोनीने सांभाळली आहेत. त्यामुळे या तिघांना विश्रांतीची आवश्यकता आहे. ताजेतवाने कोहली आणि अश्विन त्यानंतरच्या श्रीलंकेविरुद्धच्या आव्हानात्मक कसोटी मालिकेसाठी उपयुक्त ठरतील,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
अश्विनला विश्रांती दिल्यास ऑफ-स्पिनर गोलंदाजाच्या स्थानासाठी अनुभवी हरभजन सिंग आणि नवख्या परवेझ रसूलमध्ये चुरस असेल. नवोदितांना संधी देण्याचे निवड समितीचे धोरण असेल तर रसूलचे पारडे जड असेल. रॉबिन उथप्पासुद्धा संघात स्थान मिळवू शकेल. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायुडू आणि मोहित शर्मा यांचे स्थान पक्के मानले जात आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश असून, या दौऱ्यावरील असलेले अनिश्चिततेचे सावट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दूर केले आहे.