इंग्लिश भूमीवर विजयाच्या अश्वमेधावर आरूढ झालेला भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चौथा सामना जिंकत मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर त्यानंतरचे दोन्ही सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकत त्यांना मालिकेत विजयी आघाडी घेण्याची नामी संधी असेल. दुसरीकडे इंग्लंडला मालिकेत परतण्याची ही अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ जिवाचे रान करतील.
भारतीय संघाने दोन्ही सामने एकहाती जिंकले. पहिला सामना फलंदाजीच्या आणि दुसरा सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला असला तरी संघामध्ये अजूनही काही सुधारणांची गरज आहे. भारताला आतापर्यंत चांगली सलामी मिळालेली नाही. त्याचबरोबर सुरेश रैनाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही. अजिंक्य रहाणे दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकाच्या वेशीवर असतानाच बाद झालेला आहे. विराट कोहलीला अजूनही छाप पाडता आलेली नाही. सलामीवीर शिखर धवन धावांचा दुष्काळ अनुभवत आहे. गेल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या अंबाती रायुडूकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. रवींद्र जडेजाला फलंदाजीमध्ये काहीच करता आलेले नाही. गोलंदाजीमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली असली तरी खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक असल्यास भारतासाठी समस्या होऊ शकते. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांना अजूनही हवा तसा सूर गवसलेला नाही. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून अचूक भेदक मारा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे भारताने विजयाच्या नशेत मश्गूल न होता कच्च्या दुव्यांवर मेहनत घेतल्यास त्यांच्यासाठी विजय सोपा होऊ
शकतो.
एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा संघ पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला पाहायला मिळाला. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी दमदार सलामी देऊनही गेल्या सामन्यात इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. इंग्लंडच्या मधल्या फळीला आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही आणि इथेच इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडताना दिसतो. गोलंदाजीमध्येही एकाही खेळाडूला भेदक मारा करता आलेला नाही.
दोन्ही संघांचा विचार केल्यास इंग्लंडपेक्षा भारताचे पारडे नक्कीच जड आहे. पण एकदिवसीय सामन्याला एका चेंडूनेही कलाटणी मिळू शकते, त्यामुळे भारताला इंग्लंडला कमी लेखून चालणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, करण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि धवल कुलकर्णी.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), अ‍ॅलेक्स हेल्स, मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्हन फिन, हॅरी गुर्ने, ख्रिस जॉर्डन, इऑन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल आणि ख्रिस वोक्स.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ वाहिनीवर
वेळ : दुपारी ३.०० वा. पासून.