द. आफ्रिकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय

कर्णधार एबी डी’व्हिलियर्सचे नाबाद शतक
रोहित शर्माचे दीडशतक व्यर्थ

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी तीन चेंडूंमध्ये सात धावांची गरज होती.. महेंद्रसिंग धोनीसारखा अव्वल ‘फिनिशर’ फलंदाजीला होता.. भारत हा सामना जिंकणारच अशी त्यांच्या चाहत्यांनी मर्दुमकी गाजवायला सुरुवात केली होती.. कारण धोनीवर विश्वास होता, यापेक्षाही अवघड सामने त्याने यापूर्वी लीलया जिंकवून दिले होते.. २० वर्षीय कागिसो रबाडा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला.. हा मिसरुडही न फुटलेला पोरगा आफ्रिकेला कसा सामना जिंकून देऊ शकतो, याबाबत चर्चा सुरू होती.. त्याने टाकलेला चौथा चेंडू धोनीने भिरकावला खरा, पण तो रबाडाच्या हातातच स्थिरावला. त्यानंतरच्या चेंडूवर रबाडाने स्टुअर्ट बिन्नीलाही बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारताने पुन्हा एकदा जिंकता जिंकता कसे हरायचे, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला. कर्णधार एबी डी’व्हिलियर्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दीडशतक आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी साकारत भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, पण अन्य फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर सहज जिंकणाऱ्या सामन्यात पाच धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. डी’व्हिलियर्सला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना आश्वासक सुरुवात करता आली नव्हती. पण डी’व्हिलियर्सने फलंदाजीला आल्यावर सारा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. फॅफ डय़ू प्लेसिसने या वेळी (६२) अर्धशतकी खेळी साकारत डी’व्हिलियर्सला चांगली साथ दिली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डी’व्हिलियर्सने सुरुवातीला संयत खेळ करत स्थिरस्थावर होण्यावर भर दिला आणि अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. डी’व्हिलियर्सने डावातील अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत स्वत:च्या शतकासह संघाला तीनशे धावांचा पल्ला पार करून दिला. त्याने ७३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. डी’व्हिलियर्सने फरहान बेहराडिनच्या (नाबाद ३५) अखेरच्या २९ चेंडूंमध्ये ६५ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन (२३) जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणे (६०) या मुंबईकर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचत भारताला सुस्थितीत आणले. मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने दीडशतक पूर्ण केले, पण त्यानंतर लगेचच त्याला इम्रान ताहिरने बाद करत भारताला मोठा धक्का दिला. रोहितने १३३ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १५० धावांची खेळी साकारली. मोक्याच्या क्षणी धोनीने आपली विकेट आणि भारताने सामनाही गमावला.