आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत भारताच्या पहिल्या स्थानाला धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवलेला विजय त्यांच्या कामी आला असून, भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेने आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हीलियर्सने १७६ धावांची वादळी खेळी करत आपल्या वन-डे कारकिर्दीतलं २५ वं शतक झळकावलं.

ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत ४-१ ने हरवल्यानंतर भारताचा संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत सध्या आफ्रिकेचा संघ २-० ने पुढे आहे. याच कामगिरीचा फायदा घेत आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ६२४४ गुण असून भारत ५९९३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या वन-डे सामन्यात बांगलादेशला हरवल्यास त्यांचं रँकिंग आणखी सुधारेल. दरम्यान भारतालाही आपलं रँकिंग सुधारण्याची संधी आलेली आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतीय संघाने न्यूझीलंडवरही मात केल्यास भारतीय संघ कदाचित आपलं पहिलं स्थान परत मिळवू शकतो.

अशी आहे आयसीसीची नवीन क्रमवारी –

१) दक्षिण आफ्रिका – ५२ सामने – ६२४४ पॉईंट

२) भारत – ५० सामने – ५९९२ पॉईंट

३) ऑस्ट्रेलिया – ५२ सामने – ५९४८ पॉईंट

४) इंग्लंड – ५४ सामने – ६१५६ पॉईंट

५) न्यूझीलंड – ४६ सामने – ५१२३ पॉईंट

६) पाकिस्तान – ४४ सामने – ४२९२ पॉईंट

७) बांगलादेश – ३३ सामने – ३०४४ पॉईंट

८) श्रीलंका – ६२ सामने – ५२२६ पॉईंट

९) वेस्ट इंडिज – ४० सामने – ३०७७ पॉईंट

१०) अफगाणिस्तान – ३० सामने – १६१८ पॉईंट

११) झिम्बाब्वे – ४१ सामने – २१२९ पॉईंट

१२) आयर्लंड – २५ सामने – १०२८ पॉईंट