भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असणाऱ्या उमेश यादवने वयाच्या २० व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे आतापर्यंत ३३ कसोटी आणि ७० एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेश यादवने वयाच्या २० व्या वर्षी पहिल्यांदा लेदरचा चेंडू हातामध्ये घेतला. त्यामुळे या चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला खूपच सराव करायला लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाच्या गोलंदाजीची धूरा सांभाळणाऱ्या उमेश यादवने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही आठवणींना उजाळा दिला.

यादव म्हणाला की, लहानपणापासून क्रिकेट खेळत असल्यामुळे खेळातील अनेक बारकावे लक्षात होते. पण अचानक तुम्हाला काही तरी वेगळे करायला सांगितले तर ते फारच कठीण असते. सुरुवातीच्या काळात मी टेनिस आणि रबरी चेंडूवर खेळायला सुरुवात केली. वयाच्या २० व्या वर्षांपर्यंत मी सर्वसाधारण क्रिकेटमध्ये वापरणाऱ्या चेंडूवरच सराव करायचो. त्यामुळे लेदरचा चेंडू हातात आल्यानंतर मी संभ्रमात पडलो. या चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मला दोन वर्षांचा काळ लागला. या चेंडूवर प्रयोग करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याबद्दल मला कोणतीच माहिती नव्हती.

चेंडूचा टप्पा नक्की कोठे ठेवावा, हे मला समजत नव्हते. पहिल्या दोन वर्षांत मी टाकलेला कोणता चेंडू आउटस्विंग होईल आणि कोणता चेंडू इनस्विंग होईल, हे मलाच कळत नव्हते. यावेळी प्रशिक्षकांनी मला मदत केली. सुरुवातीला अचूक मारा करण्यावर लक्ष दे, असा सल्ला त्यांनी दिला. अचूक मारा करण्याची क्षमता निर्माण केल्यानंतर मी अॅक्शनमध्ये बदल केला. त्यानंतर माझ्या कारकिर्दीला गती आली.