गुवाहाटी व शिलाँग येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत यजमान भारताने पदकांची लयलूट करण्याचे सत्र तिसऱ्या दिवशीही कायम राखले. कुस्तीपटू, बॅडमिंटनपटू, तिरंदाज, वुशू तसेच सायकलस्वार आणि स्क्वॉशपटूंनी सुवर्णपदकाची कमाई करताना सोमवारचा दिवस गाजवला.
सोमवारी एकूण १९ सुवर्णपदके पटकावून भारताने पदकतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. भारताच्या खात्यात ४६ सुवर्ण, १८ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण ७० पदके जमा आहेत. ५९ पदकांसह (११ सुवर्ण, २५ रौप्य व २३ कांस्य) श्रीलंका दुसऱ्या, तर २९ पदकांसह (४ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कांस्य) पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.
बॅडमिंटनपटूंची पदकाची बोहनी
भारतीय बॅडमिंटनपटूंनी पुरुष व महिला सांघिक प्रकारात श्रीलंकेवर सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावून बोहनी केली. किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, अनू अत्री / सुमीथ रेड्डी यांचा पुरुष संघात, तर पी. व्ही. सिंधू, रुथविका शिवानी, अश्विनी पोनप्पा/सिंधू यांचा महिला संघात समावेश होता.

कुस्तीपटूंना १४ सुवर्णपदके
भारताच्या कुस्तीपटूंनी १४ सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई करत सॅग स्पध्रेत वर्चस्व गाजवले. सोमवारच्या लढतीत शिल्पी शेओरॅन (महिला – ६३ किलो), रजनी (६९ किलो) व निक्की (७५ किलो), मौसम खत्री (पुरुष-७४ किलो) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली, तर मनदीप (१२५ किलो) याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तिरंदाजांची मक्तेदारी कायम
भारताच्या कंपाऊंड प्रकारातील तिरंदाजांनी पाच सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई करून आपली मक्तेदारी कायम राखली. पूर्वशा शेंडे, ज्योती वेन्नम आणि लिली चानू पौनम यांनी सांघिक गटाचे सुवर्णपदक पटकावले, तर पूर्वशाने वैयक्तिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. मिश्र गटातही पुर्वशाने अभिषेक वर्मासह बाजी मारली. पुरुष वैयक्तिक गटात रजत चौहानने, तर सांघिक गटात वर्मा़, चौहान आणि मनाश ज्योती यांनी सुवर्णपदक पटकावले.
वुशू : एक सुवर्ण, एक रौप्यपदक
वूशू प्रकारात एम. पुनशिवा मैतेईने पुरुष गटात सुवर्ण आणि स्वचचा जटावने महिला गटात रौप्य पदकाची कमाई केली.

सायकलिंग : सुवर्णपदकाची लयलूट
भारताच्या सायकलपटूंनी सलग तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकाची लयलूट केली. महिलांच्या ४० किमी वेळ चाचणी आणि पुरुषांच्या ७० किमी वेळ चाचणी प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकाले. महिला संघात टी. बिद्यालक्ष्मी, ऋतुजा सातपुते, जी . मनिषा आणि चाओबो देवी यांचा, तर पुरुष संघात अरविंद पनवाऱ, मनजीत सिंग, दीपक कुमार राही आणि मनोहर लाल बिष्णोई यांचा समावेश आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये चार सुवर्ण
भारताचे वेटलिफ्टिरपटू व्हिक्टर अबिलाश ख्रिस्तोफर (१०५ किलो), प्रदीप (९४ किलो), विकास ठाकूर (८५ किलो) यांनी पुरुष गटात, तर कविता देवीने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
महिला हॉकी संघाचा झंझावात कायम
भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या लढतीतही वादळी खेळ करताना श्रीलंकेचे आव्हान १२-१ असे सहज परतवले. जसप्रीत कौरने सर्वाधिक पाच गोल केले. तिला सौंदर्या येंदलाने दोन, तर गुर्जी कौर, सोनिका, दीपिका, ज्योती गुप्ता आणि राणी यांनी प्रत्येकी एक गोल करून उत्तम साथ दिली.

खो-खो : भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
भारतीय पुरुष व महिला संघाने अनुक्रमे नेपाळ व श्रीलंकेचा पराभव करून खो-खो स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात भारताने नेपाळवर २२-१० असा १२ गुण व एक डाव राखून विजय मिळवला. युवराज जाधव व पी. स्रीनू यांनी दमदार खेळ केला. महिला गटात सारिका काळे, श्वेता गवळी व शीतल भोर यांच्या खेळाच्या जोरावर भारताने २४-१४ असा एक डाव व १० गुणांनी श्रीलंकेवर मात केली.
स्क्वॉश : जोश्ना चिनप्पाला सुवर्ण
अव्वल स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानच्या मारिया तुर्पाकी वझीरचा १०-१२, ११-७, ११-९, ११-७ असा पराभव करून महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले.