शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर श्रीधर आशावादी

आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा भारत-पाकिस्तान सामना १९ मार्चला धरमशाला येथेच होणार आहे, असा आशावाद स्पध्रेचे संचालक एम. व्ही. श्रीधर यांनी प्रकट केला आहे. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर श्रीधर यांनी हे मत व्यक्त केले आहे.

‘‘पाकिस्तानचे समाधान झाले आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि स्पर्धा संयोजकांच्या वतीने मला वाटते आहे. स्टेडियमची वस्तुस्थिती पाकिस्तानी पथकाने पाहिली आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. स्वाभाविकपणे ते स्वत:चे सरकार, उच्चायुक्तालय यांच्याशी संवाद साधून आपला निर्णय घेतील,’’ असे श्रीधर यांनी सांगितले.

पाकिस्तानी पथकात फेडरल चौकशी संस्थेचे (एफआयए) संचालक उस्मान अन्वर, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी आजम खान यांचा समावेश आहे.  पाकिस्तानचा पहिला सामना १६ मार्चला पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडून आलेल्या संघाशी होणार आहे, तर दुसरा सामना भारताविरुद्ध १९ मार्चला पाकिस्तानचा सामना होणार आहे.