दुबईत झालेल्या आयसीसी बैठकीच्या पाश्र्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेसंदर्भातील प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलनंतर किंवा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची एक छोटेखानी मालिका होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले की, ‘‘आमची पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांमध्ये भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असून, ही मालिका भारतात होईल की अन्यत्र ते मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु या मालिकेसाठी दुबईच्या प्रस्तावाचाही विचार सुरू आहे. आयपीएलचा सातवा हंगाम १ जूनला संपणार आहे. तथापि, भारतीय संघाचा इंग्लंड दौरा ९ जुलैपासून सुरू होणार आहे. या महिन्याभराच्या कालखंडात ही एकदिवसीय मालिका होऊ शकते.’’
२०१२मध्ये भारतीय संघ मायदेशात पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची छोटेखानी मालिका खेळला होता. या दौऱ्यासाठी बीसीसीआयला गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाली नाही, तर सदर मालिका दुबईत होऊ शकेल, अशी चिन्हे दिसत आहेत.