भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील कोणताही सामना नेहमीच उत्कंठापूर्ण वातावरणात खेळला जातो. आता हे दोन्ही संघ फुटबॉलच्या मैदानावर आमनेसामने येत आहेत.
या दोन संघांमध्ये येथे रविवारी मैत्रीपूर्ण सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामुळे नऊ वर्षांनी पुन्हा या संघांमधील क्रीडा संबंधांना सुरुवात होत आहे. यापूर्वी २००५मध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळला होता. या दोन संघांमध्ये दोन सामने आयोजित केले जात आहेत. २३ वर्षांखालील खेळाडूंमध्ये या लढती होत आहेत. दुसरा सामना २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘‘दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आम्हाला मिळेल,’’ असे भारताचे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स म्हणाले.