हरमनप्रीतची हॅट्ट्रिक ओमानवर ९-० असा दणदणीत विजय

ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पध्रेत ओमानचा ९-० असा दारुण पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. हरमनप्रीतला अरमान कुरेशी, गुरजंत सिंग, संता सिंग, मनदीप सिंग, कर्णधार हरजित सिंग आणि मोहम्मद उमर यांनी साजेशी साथ दिली. उपांत्य फेरीत भारतासमोर जपानचे आव्हान आहे.
ओमानच्या कमकुवत बचावफळीचा अभ्यास करून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमणावर भर दिला. ७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने पहिला गोल नोंदवत संघाला १-० असे आघाडीवर नेले. दहाव्या मिनिटाला कुरेशीने भारतासाठी दुसरा गोल केला. १२व्या मिनिटाला हरमनप्रीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी ३-० अशी वाढवली. त्यापाठोपाठ गुरजंत (१८ मि.), संता (२२ मि.) व मनदीप (३० मि.) यांनी गोलसपाटा लावून भारताला मध्यंतराला ६-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
पहिल्या सत्रातच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले होते, परंतु ओमानने दुसऱ्या सत्रात बचावात सुधारणा करून संघर्ष केला. त्यामुळे भारताला केवळ तीन गोलवर समाधान मानावे लागले. ४५व्या मिनिटाला हरजितने गोल केला.
५०व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर पुन्हा गोल करून स्पध्रेतील त्याची पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. ५४व्या मिनिटाला मोहम्मदने गोल करून भारताच्या विजयावर ९-० असे शिक्कामोर्तब केले.
ओमानविरुद्धच्या कामगिरीचे आमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढला आहे. इतक्या मोठय़ा फरकाने विजय मिळवल्याने उपांत्य फेरीत संघ ताकदीने खेळेल. एका वेळी आम्ही एकाच लक्ष्याचा विचार करतो आणि आता उपांत्य फेरीचा निकाल आमच्या बाजूने लावण्याचा निर्धार आहे.
-हरेंद्र सिंग, मुख्य प्रशिक्षक