अकरा स्थानांची सुधारणा करीत १३७ वा क्रमांक

भारतीय फुटबॉल संघाने जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत सहा वर्षांतील सर्वोत्तम क्रमवारीतले स्थान पटकावले. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताने अकरा स्थानांची सुधारणा करत १३७व्या क्रमांकावर झेप घेतला. गत महिन्यात मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत भारताने जागतिक क्रमवारीत वरचढ असलेल्या पोर्तो रिकोला (११४) नमवले होते. भारतीय संघाला त्याचा फायदा झाला. ऑगस्ट २०१० मध्ये भारताने १३७वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर भारताची घसरण झाली होती.

भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाईन म्हणाले की, ‘फिफा क्रमवारीत सुधारणा करण्याचे ध्येय घेऊन मी येथे आलो होतो. त्यात आम्ही यशस्वी झाल्याची ही पोचपावती आहे. हे सांघिक कामगिरीचे यश आहे, परंतु ही सुरुवात आहे. भारतीय फुटबॉलसाठी आम्ही दीर्घकालीन योजना आखल्या आहेत.’

कॉन्स्टनटाईन यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतली त्यावेळी भारतीय संघ १७१व्या स्थानावर होता. त्यानंतर त्यांची १७३व्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघाने क्रमवारीत उत्तुंग झेप घेतली.