जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडू कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत उतरणार आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पध्रेत भारतीय खेळाडूंसमोर खडतर आव्हान असणार आहे. सायनाने विश्रांतीचा निर्णय घेतल्यामुळे पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांच्यावर पदक मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
येथील एस के हॅण्डबॉल स्टेडियमवर खेळविण्यात येणाऱ्या या स्पध्रेत भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीपासूनच आव्हानांचा सामोरे जावे लागणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूचा पहिल्या फेरीत माजी विश्वविजेत्या थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनशी सामना होणार आहे. जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर विराजमान असलेल्या इन्थॅनॉनची सिंधूविरुद्ध विजयाची कामगिरी ३-० अशी आहे. या तिन्ही लढती २०१३मध्ये झाल्या होत्या. त्यात सरळ सेटमध्ये थायलंडच्या खेळाडूने बाजी मारली होती.
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या श्रीकांत समोर चीनच्या टीअ‍ॅन हाउवेईचे आव्हान आहे. या चीनी खेळाडूने यंदाच्या सत्रात ऑस्ट्रेलियन आणि मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत श्रीकांतवर सहज विजय साजरा केला आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी श्रीकांत उत्सुक आहे. राष्ट्रकुल पदक विजेत्या कश्यपलाही हाँगकाँगच्या वेई नॅनचा सामना करावा लागेल. या लढतीत कश्यपची बाजू वरचढ असून गतवर्षी चीन खुल्या स्पध्रेत कश्यपने नॅनवर विजय साजरा केला होता. इंडोनेशिया मास्टर स्पध्रेचा विजेता एच.एस. प्रणॉय सातव्या मानांकित चायनीस तैपेईच्या चोऊ टिएन चेनविरुद्ध स्पध्रेत सुरुवात करेल, तर अजय जयरामला डेनमार्कच्या विक्टर अ‍ॅस्केल्सेनशी मुकाबला करावा लागेल.
सिक्की रेड्डी व प्रज्ञा गद्रे या जोडीला पहिल्या फेरीत जपानच्या सिझुका मात्सुओ आणि मामी नेटोचे आव्हान आहे. तसेच मिश्र दुहेरीत सिक्की व तरुण कोना या जोडीला अव्वल मानांकित झँग नॅन व झाओ युन्लेई या चीनी जोडीविरुद्ध खेळावे लागणार आहे.