भारत-श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना आज; श्रीलंकेच्या संघाला दुखापतींचे ग्रहण; हरभजन सिंग, पवन नेगी यांच्यात अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस
ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच भूमीत ट्वेन्टी-२० मालिकेत चीतपट केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकाविरुद्ध विश्वचषकाच्या रंगीत तालमीसाठी सज्ज झाला आहे. अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विश्वचषकासाठी पुरेपूर सराव करण्यासाठी भारतीय संघाला ही सर्वोत्तम संधी आहे. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांची निवृत्ती आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेचा संघ कमकुवत झाला आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी मालिकेत निर्भेळ यश मिळवीत क्रमवारीतील अव्वल स्थान राखण्यासाठी उत्सुक आहेत. कसोटी आयोजनासाठी पात्र ठरलेल्या पुण्याच्या गहुंजे मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेन्टी-२० सामना होणार आहे.
विराट कोहलीला भारताने विश्रांती दिली असली तरी रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, सुरेश रैना हे सर्वच खेळाडू सध्या सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने मनीष पांडेला भारतीय संघात स्थान दिले असले तरी अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना संघव्यवस्थापनाची कसोटीच ठरणार आहे. त्याचप्रमाणे आयपीएलच्या लिलावात मोठी बोली लाभलेल्या पवन नेगीच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. नेगीबरोबरच जसप्रीत बुमराह याच्या कामगिरीबाबतही उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियातील मैदानावर त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. आशीष नेहरा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, हरभजनसिंग यांच्यावर भारताच्या गोलंदाजीची भिस्त आहे.
लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज यांच्यासह पाच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत लंकेसाठी ही मालिका अवघड कसोटी आहे. त्यातच तिलकरत्ने दिलशान हा हाताच्या दुखापतीमुळे येथील सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे लंकेच्या विजयाची जबाबदारी युवा चमूकडे आहे. अर्थात युवा खेळाडूंबरोबरच दिलहारा फर्नान्डोला संघात स्थान मिळण्याची लॉटरी लाभली आहे. २०१२ नंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
लंकेपुढे तंदुरुस्तीची समस्या
दिलशान याच्यापाठोपाठ लंकेचा अष्टपैलू खेळाडू बिनुरा फर्नान्डो हा जखमी झाल्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत पुन्हा त्यांच्यापुढे समस्या निर्माण झाली आहे. येथे सराव करताना बिनुराच्या हाताला दुखापत झाली आहे. बिनुरा याच्या जागी शमिंदा इरंगा याला पाचारण केले जाणार आहे. मात्र तो पहिल्या लढतीत खेळण्याची शक्यता कमी आहे. लंकेचा संघ ट्वेन्टी-२०चा विश्वविजेता असला तरी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना सातत्याने अपयशास सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० सामने, एकदिवसीय सामने तसेच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. वेस्ट इंडिज व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही त्यांना अपयश सहन करावे लागले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचे भारताविरुद्धचे तीनही सामने महत्त्वपूर्ण आहेत.

प्रथम फलंदाजी करणाऱ्यांना कौल 
या मैदानावर भारताने इंग्लंडविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाच गडी राखून विजय मिळविला होता, मात्र ऑस्ट्रेलियाने भारतास एकदिवसीय सामन्यात ७२ धावांनी पराभूत केले होते.

संघ-
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, हरभजनसिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी.
श्रीलंका- दिनेश चंडीमल (कर्णधार व यष्टीरक्षक), सीकुगे प्रसन्ना, मिलिंदा सिरीवर्दना, दानुश गुणतिलक, थिसारा परेरा, दासुन शनका, असीला गुणरत्ने, चामरा कपुगेदरा, दुश्मंत चमीरा, दिलहारा फर्नान्डो, कासुन रजीथा, बिनुरा फर्नान्डो, सचित सेनानायके, जेफ्री वंदरसाई. शमिंदा इरंगा.
सामन्याची वेळ : रात्री ७-३० पासून

आमचा संघ अतिशय समतोल आहे. संघातील आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असून गोलंदाजीत वैविध्य आहे. त्याच्या जोरावर लंकेविरुद्धही आम्ही सर्व सामने जिंकू. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूचे मनोधैर्य उंचावले आहे. लंकेच्या संघात प्रमुख चार-पाच खेळाडू नसले तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही. ट्वेन्टी-२० सामन्यात फाजील आत्मविश्वास काही वेळा अंगलट येतो. त्यामुळेच आम्ही लंकेविरुद्धच्या प्रत्येक सामन्यानुसार रणनीती आखणार आहोत. ही मालिका युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. आगामी आशिया चषक व त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी येथील कामगिरी अतिशय मोलाची ठरणार आहे.
– महेंद्रसिंग धोनी, भारतीय संघाचा कर्णधार

भारतीय संघाला परिस्थिती अनुकूल आहे. त्यांनी नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली आहे. हे लक्षात घेता आमची बाजू काहीशी कमकुवत आहे. त्यातच आमच्या संघात वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती आहे. तरीही आम्ही शेवटपर्यंत भारताला चिवट लढत देऊ असे श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल याने सांगितले. तो पुढे म्हणाला, आमच्या संघात अनेक नवोदित खेळाडू आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचा अनुभव नसला तरी त्यांनी स्थानिक सामन्यांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची येथे हुकमी संधी आहे. त्याचा लाभ ते घेतील अशी मला खात्री आहे. तिलकरत्ने दिलशानच्या तंदुरुस्तीबाबत तो म्हणाला, दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकेल असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याच्या समावेशामुळे आमचा संघ मजबूत होईल.
– दिनेश चंडिमल, श्रीलंकेचा कर्णधार

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,३ आणि एचडी वाहिन्यांवर