भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत गॅले येथे खेळणार आहे, असे या मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या सोनी सिक्स वाहिनीच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अद्याप श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. या मालिकेतील दुसरी कसोटी कोलंबो ओव्हल येथे २० ते २४ ऑगस्ट या दरम्यान होईल, तर तिसरी कसोटी पल्लेकेले या ठिकाणी २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून, या ठिकाणी तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. हा दौरा १९ जुलला संपणार आहे.
सप्टेंबरमध्ये बीसीसीआयची चॅॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा असू शकेल. भारतीय क्रिकेट संघ पाच वर्षांनंतर प्रथमच श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. त्या वेळी झालेली मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
श्रीलंकेहून परतल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पूर्ण मालिका खेळणार आहेत.