‘उम्मीद पे दुनिया कायम है’ असे म्हटले जाते. नागपूर कसोटीत भारतीय संघ आणि क्रिकेटरसिकांना एकच आशा लागून राहिली आहे ती म्हणजे भारताच्या विजयाची. सोमवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद करून पाहुण्यांनी विजयासाठी ठेवलेले लक्ष्य भारतीय संघ पूर्ण करेल, हीच एकमेव आशा आता उरली आहे. सामना अनिर्णीत भारतात २८ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्यासाठी इंग्लंड संघ उत्सुक आहे.
जामठय़ाच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी पहिल्या दिवसाची पुनरावृत्ती होऊन क्रिकेटरसिकांना रटाळ खेळ पाहायला मिळाला. चेंडू अजूनही अपेक्षेप्रमाणे वळत नसल्याने खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना चांगली साथ दिली नाही. भारताला जिंकण्याची मुळीच संधी न देता सामना अनिर्णीत राखण्यासाठी इंग्लंडने आखलेले वेळकाढूपणाचे धोरण त्यांना फायद्याचे ठरले.
कालच्या ८ बाद २९७ या धावसंख्येवर भारताने रविवारी सकाळी पहिला डाव सुरू केला. अखेरच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी आक्रमकपणे खेळून धावांची भर घालणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. १४१व्या षटकात मॉन्टी पनेसारने प्रग्यान ओझाचा त्रिफळा उडवला. खरेतर वेळ काढायचा असल्याने भारताचा बळी मिळवणे इंग्लंडला नको होते आणि भारताला हवे तेच घडले. त्यावेळी खेळपट्टीवर चेंडू थोडाफार का होईना, वळत असल्याची चिन्हे दिसू लागली होती. ते लक्षात घेऊन, भारतीय फलंदाजांनी २९ धावांची भर घातल्यावर १४३ षटकांनंतर ९ बाद ३२६ या धावसंख्येवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिला डाव घोषित केला. इंग्लंडच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करून, कमी धावांचे उद्दिष्ट गाठणे, ही रणनीती भारताने आखली. पण इंग्लंडने दुसऱ्या डावात संथ फलंदाजी करत चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६१ धावा करून १६५ धावांची आघाडी घेतली आहे.
या मालिकेत सुरेख फलंदाजी करणारा इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक कमनशिबीच ठरला. अश्विनच्या गोलंदाजीवर तो धोनीकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला, मात्र रिप्लेमध्ये तो बाद नसल्याचे दिसून आले. चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर प्रग्यान ओझाने निक कॉम्प्टनला पायचीत पकडले. त्यानंतर इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज केव्हिन पीटरसन याचा रवींद्र जडेजाने त्रिफळा उडवला आणि भारतासाठी आशेचा किरण दिसू लागला. परंतु त्यानंतर जोनाथन ट्रॉट व इयान बेल या जोडीने ६७ धावांची अभेद्य भागीदारी करत इंग्लंडला चांगल्या स्थितीत आणून ठेवले.
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३३०,
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. प्रायर गो. अँडरसन ३७, वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. अँडरसन ०, चेतेश्वर पुजारा झे. बेल गो. स्वान २६, सचिन तेंडुलकर त्रि. गो. अँडरसन २, विराट कोहली पायचीत गो. स्वान १०३, महेंद्रसिंग धोनी धावचीत कुक ९९, रवींद्र जडेजा पायचीत गो. अँडरसन १२, पीयूष चावला त्रि. गो. स्वान १, प्रग्यान ओझा त्रि. गो. पनेसार ३, आर. अश्विन नाबाद २९, इशांत शर्मा नाबाद २, अवांतर (बाइज-५, लेगबाइज-७) १२ , एकूण- १४३ षटकांत ९ बाद ३२६ (डाव घोषित).
बाद क्रम : १-१, २-५९, ३- ६४, ४- ७१, ५-२९५, ६-२८८, ७-२९५, ८-२९७, ९-३१७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ३२-५-८१-४, टिम ब्रेस्नन २६-५-६९-०, माँटी पनेसार ५२-१५-८१-१, ग्रॅमी स्वान ३१-१०-७६-३, जोनाथन ट्रॉट १-०-२-०, जो रूट १-०-५-०.
इंग्लंड (दुसरा डाव) : अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. अश्विन १३, निक कॉम्प्टन पायचीत गो. ओझा ३४, केव्हिन पीटरसन त्रि. गो. जडेजा ६, जोनाथन ट्रॉट खेळत आहे ६६, इयान बेल खेळत आहे २४, अवांतर (बाइज-८, लेगबाइज-६, नोबॉल-४ ) १८, एकूण- ७९ षटकांत ३ बाद १६१.
बाद क्रम : १- ४८, २- ८१, ३-९४.
गोलंदाजी : इशांत शर्मा १२-३-२७-०, प्रग्यान ओझा २३-१०-३९-१, आर. अश्विन १८-९-३४-१, पीयूष चावला १०-२-२०-०, रवींद्र जडेजा १६-९-२७-१.
क्षणचित्रे
 चहापानानंतर रवींद्र जडेजाच्या हातून सुटलेला आणि दोन-तीन टप्पे खाऊन मंद झालेला एक चेंडू इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉट याने सीमापार टोलवला. हे नियमबाह्य़ नसले, तरी अयोग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. ‘आम्ही असे केले नसते’, असे आर. अश्विन म्हणाला.
सामन्यातील आजचा खेळ कंटाळवाणा झाला, परंतु रविवार असल्याने प्रेक्षकांची गर्दी वाढली होती. सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही ‘व्हीआयपी बॉक्स’ मध्ये हजर होती.