* २२ वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका विजय
कोलंबो कसोटी ११७ धावांनी जिंकून भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली आहे. या मालिकाविजयासह विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आपल्या आक्रमक वृत्तीच्या जोरावर तब्बल २२ वर्षांपासूनचा श्रीलंकेच्या धर्तीवर कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. कोलंबो कसोटीच्या पाचव्या दिवशी विजयासाठी सात विकेट्सची आवश्यकता असताना भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत श्रीलंकेला २६८ धावांवर रोखले आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. भारताकडून फिरकीपटू अश्विनने ४ विकेट्स घेतल्या, तर इशांत शर्मा आक्रमक वृत्तीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. इशांतने ३२ धावांच्या बदल्यात श्रीलंकेच्या ३ महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले. उमेश यादवने साजेशी साथ देत दोन विकेट्स मिळवल्या.
दिवसाच्या सुरूवातीला श्रीलंकेच्या कुशल सिल्व्हा याला उमेश यादवने २७ धावांवर बाद केले. त्यानंतर अॅंजेलो मॅथ्यूज आणि लहिरू थिरिमाने मैदानावर जम बसवत असतानाच अश्विनने थिरिमानेला बाद केले आणि श्रीलंकेला पाचवा धक्का बसला. अँजेलो मॅथ्यूजच्या संयमी खेळीला कुशल परेराने साजेशी साथ देऊन दोघांनीही मैदानात तग धरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. भारताच्या विजयासाठी अडचण ठरत असणाऱया या जोडीला फिरकीपटू अश्विनने फोडले. कुशल परेराला(७०) बाद करून  अश्विनने संघाला सहावे यश मिळवून दिले. मात्र, मॅथ्यूजने आपल्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होऊ न देता शतक गाठले. शतकी खेळी साकारणाऱया मॅथ्यूजचा अडसर इशांत शर्माने दूर केला. इशांतने मॅथ्यूजला(११०) पायचीत बाद करून माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने औपचारिकता पूर्ण करावी त्याप्रमाणे उर्वरित दोन खेळाडूंना स्वस्तात माघारी धाडले आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन सुरू झाले.
दरम्यान, पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या १४५ धावांच्या खेळीमुळे भारताला तीनशेचा आकडा गाठता आला होता. मात्र, यजमानांचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी केवळ २०१ धावांवर संपुष्टात आणला. इशांतने श्रीलंकेच्या पाच खेळाडूंना माघारी धाडले. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही  दुसऱया डावात भारताच्या सुरूवातीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून धक्का दिला होता. तिसऱया दिवसाअखेर ३ बाद २१ अशी केविलवाणी स्थिती असताना रोहित शर्मा, आर.अश्विन यांच्या अर्धशतकी, तर स्टुअर्ट बिन्नीच्या ४९ धावांमुळे भारताला श्रीलंकेवर दमदार आघाडी घेता आली. नमन ओझा(३५) आणि अमित मिश्रा(३९) यांनीही तोलामोलाची साथ दिल्याने भारताला यजमानांसमोर ३८६ धावांचे आव्हान ठेवता आले होते.

धावफलक
भारत (पहिला डाव) – ३१२
श्रीलंका (पहिला डाव) – २०१
भारत (दुसरा डाव) – २७४
श्रीलंका(दुसरा डाव)- २६८