भारतीय महिला संघाने महिला विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पध्रेच्या ‘अव्वल सहा’ संघांमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मिताली राज आणि शिखा पांडे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

साखळीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ प्रत्येकी चार गुणांसह आपल्या गटात अव्वल ठरले होते. आता दुसऱ्या टप्प्यात या संघांना अन्य गटांमधील अव्वल संघांशी झुंजावे लागणार आहे. ‘अव्वल सहा’मधील गुणानुक्रमे चार संघ चालू वर्षी होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरणार आहेत. याचप्रमाणे हे संघ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पध्रेतही पात्र ठरतील.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित षटकांमध्ये ८ बाद २०५ धावा केल्या. कर्णधार मितालीने १० चौकारांसह ८५ चेंडूंत सर्वाधिक ६४ धावा केल्या, तर सलामीवीर मोना मेश्रामने ५५ धावा काढल्या. मोना आणि मिताली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मारीझानी कॅप आणि अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. डॅन व्हान नीकेर्कने एक बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेकडून एकदिवसीय प्रकारामध्ये बळींचे शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. लिझेले ली आणि लॉरा वॉलवार्ट लवकर बाद झाल्यामुळे आफ्रिकेची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्रिशा छेट्टी (५२) वगळता आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त १५६ धावांत आटोपला. शिखा पांडेने ३४ धावांत ४ बळी मिळवले, तर एकता बिश्तने २२ धावांत ३ बळी घेत तिला छान साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ८ बाद २०५ (मोना मेश्राम ५५, मिताली राज ६४; मारीझानी कॅप २/२३) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ४६.४ षटकांत सर्व बाद १५६ (त्रिशा छेट्टी ५२; शिखा पांडे ४/३४, एकता बिश्त ३/२२)

सामनावीर : मिताली राज.

दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे आमच्या संघावरील दडपण कमी झाले आहे. या टप्प्यातील अखेरचा सामना पाकिस्तानविरुद्ध असल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी सामन्यांत कामगिरीत सुधारणा करण्यावरच आमचा भर असेल – मिताली राज, भारतीय कर्णधार