ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने टीम इंडियाच्या परिस्थितींना सामोरे जाण्याच्या कौशल्याचे कौतुक केले. एका कसोटी सामन्यात निर्माण होणाऱया विविध परिस्थितींना कसे सामोरे जावे हे टीम इंडियाकडून शिकायला मिळाले, असे स्मिथने म्हटले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिका संपल्यानंतर स्मिथने पत्रकार परिषदेत हे गौरवोद्गार काढले. तो म्हणाला की, ”भारतीय संघ एका वेळी आक्रमक पद्धतीने खेळला आणि त्याचवेळी सावध भूमिकाही घेऊन खेळताना दिसला. भारतीय संघाचा हा गुण शिकण्यासारखा आहे. विविध परिस्थितांना सामोरं जाण्याची कला तुम्हाला शिकायलाच हवी. भारतीय संघाला ती चांगली जमली.”

मालिकेदरम्यान स्मिथ आणि त्याच्या संघ सहकाऱयांसोबत भारतीय संघातील खेळाडूंचे खटके उडाल्याचे आपण पाहिले. स्मिथने धरमशाला कसोटीवेळी ड्रेसिंग रुममधून मुरली विजयला शिवीगाळ केल्याचेही कॅमेरात कैद झाले होते. त्यावर स्मिथने माफी देखील मागितली. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाविरुद्ध आक्रमक दिसणाऱया स्मिथने मालिका गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत पराभवाचा स्विकार केला आणि भारतीय संघाचे कौतुक केले.

 

जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूवर दबाव निर्माण करण्यात यशस्वी होता. तेव्हा तुम्हाला नक्कीच विकेट्स मिळतात. या मालिकेत विविध परिस्थितींचा सामना करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून खूप काही शिकता आले. भारताने संयमी सुरूवात करून योग्य संधीची वाट पाहिली. चांगली सुरूवात मिळाली की मग परिस्थितीनुसार सामन्यावर ते पकड निर्माण करत होते. संपूर्ण मालिकेत ते याच भूमिकेने खेळले, असे स्मिथ म्हणाला.

दरम्यान, स्मिथने संघाचा कर्णधार म्हणून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली. स्मिथने चार कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४९९ धावा ठोकल्या. यात तीन खणखणीत शतकांचा समावेश होता.