पहिल्या कसोटीतील प्रदर्शनातील त्रुटी सुधारत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रलिया ‘अ’ संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत असलेल्या खेळाडूंचा ‘अ’ संघात समावेश होतो. यादृष्टीने दोन कसोटी सामन्यांची मालिका महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या कसोटीत चांगल्या प्रदर्शनानंतर भारतीय खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र गोलंदाजांना साहाय्यक चेन्नईच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपली छाप सोडली.
भारत ‘अ’ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धावांसाठी झगडणारा पुजारा ११ धावा करून तंबूत परतला. थोडय़ाच वेळात अभिनव मुकुंदही माघारी परतला. श्रीलंका दौऱ्यासाठी सराव म्हणून या सामन्यात खेळायला मिळावे, अशी विनंती भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली होती. मात्र तोही झटपट तंबूत परतला. फिरकीपटू अ‍ॅश्टन अगरने त्याला पायचीत केले. कोहलीने १६ धावा केल्या. युवा करुण नायरने संयमी खेळ करत पडझड थांबवली. मुंबईकर श्रेयस अय्यर एका धावेवर बाद झाला. यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझाला अगरनेच बाद केले. त्याला फक्त १० धावा करता आल्या. युवा बाबा अपराजित स्वयंचलित बाद झाला. श्रेयस गोपाळ, वरुण आरोन, शार्दूल ठाकूर आणि प्रग्यान ओझा या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता न आल्याने भारत ‘अ’ संघाचा डाव १३५ धावांतच गडगडला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे गुरिंदर संधूने सर्वाधिक ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने पहिल्या दिवसअखेर बिनबाद ४३ अशी मजल मारली. कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट २४ तर उस्मान ख्वाजा १३ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही ९२ धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : ६८.५ षटकांत सर्व बाद १३५ (करुण नायर ५०, गुरिंदर संधू ३/२५, अ‍ॅश्टन अगर २/२३)
ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : बिनबाद ४३ (कॅमेरून बॅनक्रॉफ्ट खेळत आहे २४, उस्मान ख्वाजा खेळत आहे १३)

दोन्ही संघांची कलाम यांना श्रद्धांजली
माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांना दोन्ही संघांनी श्रद्धांजली वाहिली. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी दोन मिनिटे शोक व्यक्त केला. दोन्ही संघ या सामन्यात दंडाला काळी फित लावून खेळणार आहेत.