भारताला जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विश्वचषक व ऑलिम्पिक विजेत्या नेदरलॅण्ड्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत त्यांना भक्कम बचावात्मक खेळावर विशेष लक्ष द्यावे लागेल.
या स्पर्धेत भारतीय महिलांनी आतापर्यंत बचावात्मक खेळात खूपच कमकुवतपणा दाखवला आहे. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघांना झाला होता. नेदरलॅण्ड्सविरुद्ध या चुका खूप महागात पडण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी लढतीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या खराब खेळामुळे कांगारूंना दहा पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. नेदरलॅण्ड्सविरुद्ध अशा चुका झाल्या तर भारताचे आव्हान टिकणे अवघड आहे.
‘‘बचावात्मक खेळात आमच्या खेळाडूंनी खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आमचे खेळाडू चांगल्या आक्रमक चाली करतात, मात्र त्या करताना त्यांच्याकडून खूप अनावश्यक चुका होतात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही उगाचच चुका करीत प्रतिस्पर्धी संघास पेनल्टी कॉर्नर बहाल केले. आक्रमक चालींना आक्रमक शैलीनेच उत्तर देणे योग्य असते. खेळाडूंनी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आमच्या खेळाडूंना खूप प्रगती करावी लागणार आहे,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक मथायस अ‍ॅहरेन्स यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एकाच वेळी आमच्या आठ खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या बचाव क्षेत्राजवळ खेळत होते. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याची काळजी आमच्या खेळाडूंनी घेतली पाहिजे. आमच्यापुढे नेदरलॅण्ड्सचे खूप मोठे आव्हान असले तरी यापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चिवट लढत दिली होती. त्यामुळे या सामन्यात आमच्या खेळाडू कौतुकास्पद झुंज देतील अशी मला खात्री आहे.’’
भारतीय संघाने नेदरलॅण्ड्सवर मात केली तर त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट लाभणार आहे.