पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये इयान बेलच्या बॅटला गंज लागला की काय, अशी टीका होत असली तरी तिसऱ्या सामन्यात मात्र दमदार दीडशतक ठोकत त्याने सर्व उणीव भरून काढली. बेल आणि बॅलन्स यांच्या दीडशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव ५६९ धावांवर घोषित केला असून भारतासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. कारण दुसऱ्या दिवसअखेर भारताची १ बाद २५ अशी स्थिती असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना ३७० धावांचा आकडा गाठावा लागेल. भारताचा सलामीवीर शिखर धवन सलग तिसऱ्या कसोटीतही अपयशी ठरला. निर्जिव खेळपट्टीवर क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल आणि  सदोष पंचगिरीमुळे इंग्लंडचे फलंदाज सुदैवी ठरले.
बॅलन्स आणि बेल यांनी दिवसाची चांगली सुरुवात करत तिसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी रचली. बॅलन्सने २४ चौकारांच्या जोरावर १५६ धावांची दमदार खेळी साकारली, बॅलन्सचे हे कारकिर्दीतले तिसरे आणि भारताविरुद्धचे दुसरे शतक ठरले. बेलने या सामन्यात कारकिर्दीतील २१ वे शतक झळकवताना सात हजार धावांचा पल्लाही गाठला, त्याने १९ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर १६७ धावांची अप्रतिम खेळी साकारली. मॅट प्रायरच्या जागी संघात आलेला यष्टीरक्षक जोस बटलरनेही खेळपट्टीचा फायदा उचलत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरोवर ८३ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीन आणि रवींद्र जडेजाने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : १६३.४ षटकांत ७ बाद ५६९ (इयान बेल १६७, गॅरी बॅलन्स १५६ ; भुवनेश्वर कुमार ३/१०१)
भारत (पहिला डाव) : १४ षटकांत १ बाद २५
(मुरली विजय खेळत आहे ११, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ४; जेम्स अँडरसन १/१४)