लॉर्ड्सच्या ऐतिहासिक विजयाची नशा भारतीय क्रिकेटपटूंच्या डोक्यातून उतरल्याचे तरी दिसत नाही आणि त्यामुळेच तिसऱ्या कसोटी सामन्यात उतरताना त्यांच्यामध्ये जिंकण्याची ईर्षां दिसली नाही. विजयाच्या गुर्मीत सुस्तावलेल्या भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या आणि संघाचे वस्त्रहरण झाले. ट्वेन्टी-२०च्या मुशीत वाढलेले भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात मोईन अलीच्या फिरकीसमोर नतमस्तक झाले आणि भारतावर तब्बल २६६ धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे.
विजयासाठी ४४५ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य समोर असताना चोरटी धाव घेण्यात आणि मोठे फटके मारण्यात भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट्सचे आंदण दिले. त्यामुळेच दुसऱ्या डावात भारतीय संघ १७८ धावांतच कोसळला.
पाचव्या दिवशीच्या पहिल्या सहा षटकांमध्येच भारताने रोहित शर्मा आणि धोनी यांच्या विकेट्स बहाल केल्या आणि इंग्लंडचा विजय सुकर झाला. अजिंक्य रहाणेने (नाबाद ५२) एकाकी झुंज दिली, पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. अलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत दुसऱ्या डावात भारताच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्याची किमया साधली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ५६९ (डाव घोषित), भारत (पहिला डाव) : ३३०, इंग्लंड (दुसरा डाव) : २०५ (डाव घोषित), भारत (दुसरा डाव) : ६६.४ षटकांत सर्वबाद १७८ (अजिंक्य रहाणे नाबाद ५२; मोईन अली ६/६७)
सामनावीर : जेम्स अँडरसन.