लॉर्ड्स कसोटीत सर्वागीण खेळ करत कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने या कसोटीत मात्र सावधच पवित्रा स्वीकारत इंग्लंडसमोर गुडघे टेकले. इंग्लंडच्या ५६९ धावांच्या डोंगरासमोर १ बाद २५ वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३२३ अशी अवस्था आहे. भारतीय संघापुढचे लक्ष्य आहे फॉलोऑन वाचवण्याचे. फॉलोऑन वाचवण्यासाठी त्यांना अजूनही ४७ धावांची आवश्यकता असून कर्णधार महेंद्रसिंग धोनी ५० तर मोहम्मद शमी ४ धावांवर खेळत आहेत.
 चेतेश्वर पुजारा चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रुपांतर करू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉडने त्याला २४ धावांवर बाद केले. अर्धशतकाकडे कूच करणारा मुरली विजय स्टुअर्ट ब्रॉडची शिकार ठरला. त्याने ३५ धावांची खेळी केली. विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोठी खेळी साकारण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणाऱ्या कोहलीला अँडरसनने चकवले. कूकच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. त्याने ३९ धावा केल्या. कोहली बाद झाल्यामुळे भारताची ४ बाद १३६ अशी अवस्था झाली. स्टुअर्ट बिन्नीच्या जागी संधी मिळालेल्या रोहित शर्माने अजिंक्य रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. दोन मुंबईकर फलंदाजांनी संयमाने खेळ करत डाव सावरला. मोइन अलीच्या गोलंदाजीवर एक धाव घेत रहाणेने अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला केवळ सहा मिनिटे बाकी असताना रोहित शर्मा मोइन अलीच्या गोलंदाजीवर खराब फटका मारुन बाद झाला. त्याने २८ धावा केल्या. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे जोडीने पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी खेळी आवश्यक असणाऱ्या रोहित शर्माने पुन्हा एकदा स्वस्तात आपली विकेट टाकण्याची परंपरा कायम राखली. अजिंक्य रहाणेही मोठा फटका खेळण्याचा मोह टाळू शकला नाही. मोइन अलीनेच त्याला ५४ धावांवर बाद केले. रवींद्र जडेजा ३१ धावा करून तंबूत परतला. जडेजा-धोनी जोडीने सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारने १९ धावांची खेळी करत धोनीला साथ देण्याचा प्रयत्न केला. या जोडीने आठव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ७ बाद ५६९, भारत (पहिला डाव) : ८ बाद ३२३ (अजिंक्य रहाणे ५४, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे ५०, जेम्स अँडरसन ३/५२, स्टुअर्ट ब्रॉड ३/६५)