सलामीवीर शिखर धवन आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीने गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३९९/३ अशी होती. अजुनही शतकवीर चेतेश्वर पुजारा मैदानात तळ ठोकून आहे, तर त्याला मुंबईकर अजिंक्य रहाणे दुसऱ्या बाजूने ३९ धावांवर साथ देत खेळतो आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत अभिनव मुकुंदला संघात स्थान देण्यात आलं. मात्र या संधीचं सोनं करायला मुकुंद कमी पडला. नुवान प्रसादने अवघ्या १२ धावांवर त्याला तंबूत पाठवलं. यानंतर मात्र भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजाराच्या सहाय्याने शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली. विशेषकरुन शिखर धवनने लंच टाईम आणि चहापानानंतर धडाकेबाज खेळ करत आपलं शतक साजरं केलं. मात्र पुन्हा एकदा नुवान प्रदीपने भारताची ही जोडी फोडली. आपल्या द्विशतकापासून अवघ्या १० धावा दूर असताना शिखर धवन अँजलो मॅथ्यूजकडे झेल देत माघारी परतला. शिखरने १६८ चेंडुंमध्ये १९० धावांची खेळी केली. या खेळीत शिखरने तब्बल ३१ चौकार लगावले.

कर्णधार विराट कोहलीला मात्र पहिल्या डावात फारशी चमक दाखवता आली नाही. अवघ्या ३ धावांवर विराट नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर डिकवेलाकडे झेल देत माघारी परतला. मात्र यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने यापेक्षा जास्त संघाची पडझड होऊ दिली नाही. विराट कोहली बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपलं शतकही साजरं केलं. हे त्याच्या कारकिर्दीतलं १२ वं शतक ठरलं. तर अजिंक्य रहाणेनेही त्याला चांगली साथ दिली. आपल्या ठेवणीतले काही सुरेख फटके लगावत, अजिंक्यने अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामुळे उद्याच्या पहिल्या सत्रात जास्तीत जास्त धावा काढून श्रीलंकेवर दबाव टाकण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.

 

श्रीलंकेकडून आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो नुवान प्रदीप, भारताच्या ३ फलंदाजांना त्यानेच माघारी धाडलं. बाकी सर्व फलंदाजांना शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या फटकेबाजीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं मोठं लक्ष्य असणार आहे.

  • पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताची धावसंख्या ३९९/३
  • अजिंक्य रहाणेचीही चेतेश्वर पुजाराला चांगली साथ, भारताचा धावांचा डोंगर
  •  पुजाराची मात्र संयमी फलंदाजी, रहाणेच्या सोबतीने पुजाराचं संयमी शतक
  • चहापानानंतर नुवान प्रदीपचा भारताला पुन्हा दणका, विराट कोहली ३ धावांवर बाद
  • चहापानापर्यंत भारताची धावसंख्या २८२/२
  • नुवान प्रदीपने पुन्हा भारताची जमलेली जोडी फोडली
  • द्विशतकापासून १० धावा दूर असताना शिखर धवन बाद, भारताला दुसरा धक्का
  • शिखर धवनचा श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल सुरुच
  • चेतेश्वर पुजाराची शिखर धवनला चांगली साथ, पुजाराच्या अर्धशतकाने श्रीलंका बॅकफूटवर
  • लंच टाईमनंतर शिखर धवनचा श्रीलंकन गोलंदाजांवर हल्लाबोल, शतकही केलं साजरं
  • लंच टाईमपर्यंत भारताची धावसंख्या ११५/१, भारत सुस्थितीत
  • शिखर धवनचं मात्र पहिल्याच कसोटीत खणखणीत अर्धशतक
  • शिखन धवनने पुजाराच्या सहाय्याने भारताचा डाव सावरला, दोघांमध्ये आतापर्यंत अर्धशतकी भागीदारी
  • मात्र नुवान प्रदीपने भारताची जोडी फोडली, डिकवेलाकडे झेल देत अभिनव मुकुंद माघारी
  • दोन्ही सलामीवीरांकडून भारताच्या डावाची सावध सुरुवात
  • लोकेश राहुल ऐवजी अभिनव मुकुंदला संघात स्थान, तर हार्दिक पांड्याचंही कसोटी संघात पुनरागमन
  • नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

अवश्य वाचा – पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर