भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून वन-डे मालिकेला सुरुवात होत आहे. उद्या दम्बुल्लाच्या मैदानावर पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाच्या मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने आज नेट्समध्ये जोरदार सराव केला. यावेळी धोनीने भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांच्या देखरेखीखाली खास सराव केला. यावेळी कट, ड्राईव्ह, स्लॉग, अपर कट, पुल ही आपल्या भात्यामधली सर्व अस्त्र धोनीने आजमावून पाहिली. उसळी घेणारे चेंडू सोडून देण्याचा सरावही यावेळी संजय बांगर यांनी धोनीकडून करवुन घेतला. बीसीसीआयने धोनीच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे.

याआधी चॅम्पियन्स करंडकात धोनीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीने काही चांगल्या खेळी केल्या, मात्र त्याच्या संथ खेळीमुळे अनेकांनी धोनीवर टीका केली होती. राहुल द्रविडसारख्या माजी खेळाडूनेही धोनी आणि युवराजसाठी संघामध्ये पर्याय शोधण्याची गरज असल्याचं म्हणलं होतं. मात्र भारतीय संघाने नवीन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने धोनीला अभय दिलं होतं. यानंतर श्रीलंका दौऱ्यात युवराजला विश्रांती देण्यात आली होती, मात्र धोनीला संघात जागा देण्यात आली. मात्र आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून धोनी हा आमच्यासमोरचा एकमेव पर्याय नाही, यापुढे तरुण खेळाडूंना संघात जागा मिळेल असे सुतोवाचही निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांनी केले होते.

अवश्य वाचा – धोनी हा एकमेव पर्याय नाही, निवड समिती प्रमुखांचा सूचक इशारा

चहुबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान आता धोनीसमोर असणार आहे. म्हणूनच पहिल्या सामन्याआधी धोनीने नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरुवात होत असलेल्या वन-डे मालिकेत भारताचा संघ कशी कामगिरी करतो आणि धोनी कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.