३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतल्यानंतर आगामी वन-डे मालिकेत भारताच्या दिग्गजांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. याव्यतिरीक्त जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही आगामी वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद हे गेल्या काही दिवसांमधली भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि आगामी मालिकांचं व्यस्त वेळापत्रक पाहता वन-डे मालिकेसाठी संघ निवडणार आहेत.

युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, कृणाल पांड्या या नवोदीतांना आगामी मालिकेत संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ‘अ’ संघाकडून या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. याव्यतिरीक्त जसप्रीत बुमराहचा संघात समावेश नक्की मानला जात आहे.

अवश्य वाचा – ‘हे’ आहेत भारताचे सर्वात यशस्वी ५ सलामीवीर

आगामी काळात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचं व्यस्त वेळापत्रक पाहता वन-डे मालिकेत बीसीसीआय आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.

कर्णधार विराट कोहलीलाही श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याची चर्चा सुरु होती. मात्र कोहलीने वन-डे मालिकेत आपण खेळणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेत कोणत्या खेळाडूंची संघात निवड होते हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – कुलदीप की अक्षर, कोहलीला कोण ‘पटेल’?