भारत आणि श्रीलकां यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत केले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजी कोलमडल्यामुळे सामना श्रीलकांच्या बाजून झुकला होता. मात्र महेंद्रसिंह धोनीने भुवनेश्वर कुमारच्या साथीने भारताचा डाव सावरला. एवढेच नाही या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. महेंद्रसिंह धोनी नाबाद  ४५ तर भुवनेश्वर कुमारने नाबाद ५३ धावांची खेळी करत संघर्षमय झालेल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्मा (५४), शिखर धवन (४९) धावा केल्या. त्यांच्या शतकी भागीदारीनंतर लोकेश राहुल (४), केदार जाधव (१) आणि कर्णधार विराट कोहली (४) सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर धोनी आणि भुवनेश्वर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सुरुवातीला संयमी खेळी करणाऱ्या भुवनेश्वरने धोनीला मागे टाकत कारकिर्दीतील अविस्मरणीय अर्धशतक साजरे केलं.

विराट कोहलीने  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात म्हणावा तशी चांगली झाली नाही. सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर सिरिवंर्धना आणि कपुगेद्रा या दोघांनी श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. सिरिवंर्धना २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. त्याला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. कपुगेद्राने ४० धावांचे योगदान दिले. त्यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या. पावसाने खेळात व्यत्यय आणल्यामुळे भारताला ४७ षटकांत २३१ धावांचे लक्ष देण्यात आले होते. या सामन्यात श्रीलंकेच्या नवोदित फिरकीपटू अकिला धनंजयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या सामन्यात त्याने तब्बल ६ बळी मिळवले. त्याच्या आतापर्यंतच्या चार एकदिवसीय सामन्यातील ही सर्वोच्च कामगिरी आहे.