कसोटी आणि वन-डे मालिकेपाठोपाठ एकमेव टी-२० सामन्यातही भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. कोलंबोच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. कर्णधार विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

श्रीलंकेने भारतासमोर १७१ धावांचं आव्हान ठेवल होतं. मात्र भारतीय फलंदाजांना वेसण घालण्यात लंकेचे गोलंदाज पुन्हा अपयश ठरले. मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तब्बल १२ विक्रमांची नोंद केली.

० – धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत एकही फलंदाज टी-२० सामन्यात विराट कोहली इतक्या धावा काढू शकला नाही. याआधी न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्यूलमच्या नावे हा विक्रम होता. मॅक्यूलमच्या नावावर १००६ धावा होत्या, मात्र काल ८२ धावांची खेळी करुन कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. कोहलीच्या नावावर आता १०१६ धावा जमा आहेत.

१ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० च्या सरासरीने १५ हजार धावा करणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

१- यजमान संघाला प्रत्येक सामन्यात हरवून व्हाईट वॉश देणारा भारत हा पहिला संघ ठरला. श्रीलंका दौऱ्यात भारताने श्रीलंकेवर कसोटी, वन-डे आणि टी-२० मिळून ९-० अशी मात केली.

२ – टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनीची आतापर्यंतची सरासरी ही ४९.१८ एवढी आहे.

३ – टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. कोहलीच्या पुढे या यादीत ब्रँडन मॅक्युलम (२१४०) आणि तिलकरत्ने दिलशान (१८८९) हे दोन खेळाडू आहेत.

९ – ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० असा विजय मिळवत भारताने श्रीलंकेवर संपूर्ण दौऱ्यात ९-० असा विजय मिळवला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

१७ – टी-२० क्रिकेटमध्ये ५० किंवा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर, कोहलीने आतापर्यंत १७ वेळा अशी कामगिरी केली आहे.

३३ – आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणारा विराट कोहली हा ३३ वा खेळाडू ठरलेला आहे.

५० – कोलंबोच्या मैदानात खेळवला गेलेला सामना हा विराट कोहलीच्या कारकिर्दीतला ५० वा टी-२० सामना होता.

७४ – आपल्या ५० व्या टी-२० सामन्यात खेळताना तिलकरत्ने दिलशानने याआधी ७४ धावांची खेळी केली होती. काल हा विक्रम विराट कोहलीने ८२ धावांची खेळी करुन मोडीत काढला.

८२ – धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधली ही संयुक्तरित्या सर्वाधिक धावसंख्या ठरली.

८४.६६ – टी-२० क्रिकेटमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीची सरासरी.