कँडी कसोटीत भारताने श्रीलंकेचा १ डाव आणि १७१ धावांनी पराभव करत कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला. भारताच्या दृष्टीकोनातून हा हंगाम अतिशय चांगला ठरलेला आहे. मोठ्या कालावधीनंतर भारताचा हा परदेशातला पहिला कसोटी मालिका विजय ठरलेला आहे.

रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारख्या खेळाडूंनी आपला फॉर्म कायम राखत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. तर हार्दीक पांड्याच्या रुपाने भारताला कसोटी संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू सापडला. ५ दिवसांच्या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी विजय संपादन करत मालिकेवर आपलं नाव कोरलं.

तिसऱ्या दिवशी कँडीच्या मैदानात या १२ विक्रमांची नोंद करण्यात आली –

० – याआधी श्रीलंकेने घरच्या मैदानावर सलग दोनवेळा डावाने पराभव स्विकारलेला नव्हता.

१ – ३ किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्ध्याला त्याच्या घरच्या मैदानावर व्हाईटवॉश देण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे.

२ – श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत १ डाव आणि १७१ धावांनी मिळालेला विजय हा भारताचा बाहेरच्या मैदानावरचा दुसरा मोठा विजय ठरला. याआधी १० वर्षांपूर्वी भारताने ढाका कसोटीत बांगलादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी पराभव केला होता.

२ – घरच्या मैदानावर व्हाईटवॉश स्विकारण्याची ही श्रीलंकेची दुसरी वेळ. २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेला पहिल्यांदा व्हाईटवॉश मिळाला होता.

२ – पहिल्या २९ कसोटींनंतर सर्वाधिक विजय मिळवणारा विराट कोहली हा दुसरा यशस्वी कर्णधार ठरला आहे. कोहलीने २९ पैकी १९ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या कोहलीच्या पुढे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ आणि रिकी पाँटींग हे २१ विजयांसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत.

३ – घरच्या मैदानावर एकही अर्धशतक न झळकावण्याची श्रीलंकेची ही तिसरी वेळ ठरली. याआधी १९८६ साली पाकिस्तानविरुद्ध कँडी कसोटीत तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर १९९३ साली ही नामुष्की श्रीलंकेवर ओढावली होती.

४ – घरच्या मैदानावर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कसोटी सामना गमावण्याची ही श्रीलंकेची चौथी वेळ. याआधी २००६ साली पाकिस्तानविरुद्ध कँडी कसोटीत श्रीलंकेला तिसऱ्या दिवशीच कसोटी सामना गमवावा लागला होता.

५ – श्रीलंकेविरुद्ध गेल्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. मात्र श्रीलंकेला भारताविरुद्ध अजुनही कसोटी सामना जिंकता आलेला नाहीये.

५ – ३ किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्ध्याला व्हाईटवॉश देण्याची भारतीय संघाची ही ५ वी वेळ ठरली.

८ – ३ किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाने यजमान संघाला व्हाईटवॉश देण्याची ही आठवी वेळ ठरली. याआधी २००६ साली ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला अशीच मात दिली होती.

९ – श्रीलंकेविरुद्ध एकूण नवव्या कसोटी विजयासह भारताने पाकिस्तानचा सर्वाधीक ८ विजयांचा विक्रमही मोडीत काढला.

३७.५३ – या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमधल्या सरासरीचं अंतर हे तब्बल ३७.५३ इतकं ठरलं. घरच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या कसोटी मालिकांमधलं हे सर्वाधीक अंतर आहे. याआधी १९९४ साली पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत हे अंतर ३०.१४ इतकं होतं.