कसोटी मालिकेपाठोपाठ श्रीलंकेच्या संघाने ५ वन-डे सामन्यांची मालिका ३-० ने गमावली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात आता २ वन-डे आणि १ टी-२० सामन्याचा खेळ बाकी राहिला आहे. मात्र या सामन्यातही श्रीलंकेचा संघ भारताचा कितपत प्रतिकार करेल हा प्रश्नच आहे. श्रीलंकेच्या वन-डे संघाचा कर्णधार उपुल थरंगा याच्यावर दोन सामन्यांची बंदी टाकण्यात आली. यानंतर चमार कपुगेरदाकडे श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र आता चमार कपुगेरदानेच आपली हार मानलेली आहे. सामने कसे जिंकतात हे आम्ही विसरुन गेलोय, असं वक्तव्य चमार कपुगेदराने केलं आहे.

संघात कोणत्याही समस्या नाहीयेत. फक्त सामने कसे जिंकता येतात हे आम्ही विसरुन गेलो आहोत. अनेक वेळा आम्ही विजयाच्या जवळ आलेलो असतो, मात्र मोक्याच्या क्षणी आम्ही क्षुल्लक चुका करतो आणि सामना गमावतो. अशाप्रकारे मोक्याच्या क्षणी चुका करणं आम्हाला टाळावं लागणार आहे, असं कपुगेदराने म्हणलं आहे.

कसोटीपाठोपाठ वन-डे मालिकेवरही श्रीलंकेला आता पाणी सोडवं लागलं आहे. मात्र अशा परिस्थितीतही कपुगेदरा आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर आनंदी आहे. मात्र आमच्या फलंदाजांनी प्रत्येक सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. जर पुढचे सामने आम्हाला जिंकायचे असतील तर फलंदाजांनी मैदानात चांगली कामगिरी करुन दाखवणं गरजेचं असल्याचं कपुगेदरा म्हणाला.

अवश्य वाचा – VIDEO: …अन् धोनी मैदानावरच झोपला

तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताच्या ४ फलंदाजांना माघारी धाडण्यात लंकेच्या गोलंदाजांना यश आलं होतं. अकिल धनंजयने दोन सामन्यांमध्ये आश्वासक कामगिरी केली होती. मात्र रोहीत शर्माने केलेलं शतक आणि त्याला महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत दिलेली भक्कम साथ या जोरावर भारताने तिसरा वन-डे सामना ६ गडी राखून जिंकला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची कामगिरी पाहून कँडीच्या मैदानात आलेल्या श्रीलंकन प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या फेकत आपला रोष व्यक्त केला. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा सामना पुन्हा खेळवण्यात आला. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ भारताला टक्कर देणार की नाही हे पहावं लागणार आहे.