भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसलेला आहे. लंकेचा अष्टपैलू खेळाडू असेला गुणरत्ने गॉल कसोटीत डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे माघारी परतला आहे. ही दुखापत इतकी गंभीर आहे की पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नसल्याचं कळतंय. स्लीपमध्ये शिखर धवनचा झेल पकडत असताना गुणरत्नेच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला कोलंबो येथे पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलं.

पहिल्या डावातील १४ व्या षटकात लहिरु कुमारच्या गोलंदाजीवर चेंडू शिखर धवनच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये गेला. यावेळी असेला गुणरत्ने दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, यावेळी हा झेल घेण्याच्या प्रयत्नात गुणरत्नेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. गुणरत्नेकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत शिखर धवनने पहिल्या कसोटीत धडाकेबाज शतक ठोकलं आहे. त्यामुळे शिखर धवनला दिलेलं हे जीवदान श्रीलंकेला कितपत महाग पडतंय हे पहावं लागणार आहे.

यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत आता अजून भर पडलेली आहे. क्षेत्ररक्षणासाठी सध्या बदली खेळाडू म्हणून धनंजय डी’ सिल्वा मैदानात उतरला असून श्रीलंकेचा एक फलंदाज आता कमी झालेला आहे. त्यामुळे आता मोठी धावसंख्या उभारुन श्रीलंकेवर दडपण टाकण्याचा भारतीय फलंदाजांचा प्रयत्न असणार आहे.
त्यामुळे या संकटातून श्रीलंकेचे खेळाडू कसा मार्ग काढतात हे पहावं लागणार आहे.