श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या सहकाऱ्यांचे कान टोचले आहेत. “वन-डे संघात कोणत्याही खेळाडूने संघात आपली जागा पक्की धरुन चालु नये. भारतीय संघांl बदली खेळाडूंची ताकद खूप मोठी आहे, बदली खेळाडूंमध्येही पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे आपली जागा संघात पक्की करायची असेल तर मैदानात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवण्याचा एकमेव पर्याय सर्वांसमोर उपलब्ध असल्याचं”, कोहली म्हणाला.

पहिला सामना सुरु होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. “संघात जागा मिळवण्यासाठी सध्या स्पर्धा वाढतेय. प्रत्येक खेळाडू आपल्या सहकाऱ्यांच्या तोडीस-तोड खेळतोय. अजिंक्य रहाणे हा भारतासाठी वन-डे सामन्यात महत्वाचा खेळाडू आहे, मात्र शिखर आणि रोहीतच्या उपस्थितीत त्याला संघात कधीकधी जागा मिळत नाही, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे हा संघासाठी पहिल्या पसंतीचा सलामीवीर आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपली जागा कायम राखण्यासाठी चांगली कामगिरी करत रहावी लागतेय.”

याआधी भारताच्या वन-डे संघात आपली जागा कायम करण्यासाठी एवढी मेहनत कोणालाही घ्यावी लागली नसेल. वन-डे संघात निवड झालेल्या लोकेश राहुललाही संघात आपली जागा पक्की करण्यासाठी मनीष पांडेसोबत सामना करावा लागणार आहे. कोहलीच्या आतंराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला नुकतीच ९ वर्ष पूर्ण झालेली आहेत. ९ वर्षांपूर्वी दम्बुल्लाच्या मैदानात धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेत भारताचा संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – रनमशीन कोहली रंगला आठवणींत