भारत विरुद्ध श्रीलंका गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शिखर धवनने १९० धावांची वादळी खेळी केली. या खेळीत शिखर धवनने तब्बल ३१ चौकार लगावले. मात्र या मैदानात उभं राहून आपण एवढी मोठी खेळी करु याची कल्पना खुद्द शिखर धवननेही केली नव्हती. श्रीलंकेविरुद्ध भारतीय कसोटी संघात मुरली विजय आणि लोकेश राहुलची निवड झाली होती. मात्र मुरली विजयच्या खांद्याची दुखापत बळावल्यामुळे ऐनवेळी शिखर धवनला संघात पाचारण करण्यात आलं. यावेळी शिखर धवन हाँगकाँगमध्ये सुट्टीवर होता.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धवन पत्रकारांशी बोलत होता. “श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी मला माझ्या परिवारासोहत ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये एकत्र वेळ घालवायचा होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ऑस्ट्रेलिया राहिली दूरच, हाँगकाँगची सुट्टी अर्ध्यावर सोडून मी श्रीलंकेत दाखल झालो. अर्थात कसोटी संघात पुनरागमन झाल्याचा मला आनंद आहे. मुरली विजय दुखापतग्रस्त असल्यामुळे मला संधी मिळाली, आणि मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा उचलला.”

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत, मुरली विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. मात्र ती दुखापत घेऊन विजय ती मालिका खेळला. श्रीलंकेत कसोटी मालिका खेळता यावी यासाठी त्याने आयपीएलच्या दहाव्या पर्वावरही पाणी सोडलं. मात्र संघात निवड झाल्यानंतर, पुन्हा त्याच्या दुखापतीने डोकं वर काढल्यामुळे शिखर धवनला संघात जागा मिळाली, जिचा शिखर धवनने पुरेपूर फायदा उचलला.

पहिल्या डावात भारताने श्रीलंकेसमोर धावसंख्येचा डोंगर उभारला आहे. त्याला उत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात अडखळती झालेली आहे. त्यामुळे हा सामना वाचवण्यासाठी श्रीलंका कसा खेळ करतं हे पहावं लागणार आहे.