प्रशिक्षक अनिल कुंबळेंचा राजीनामा, चॅम्पियन्स ट्रॉफीतला भारताचा पराभव यामधून सावरत अखेर टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहचली आहे. उद्यापासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताचा संघ त्रिनिनादला पोहचताच वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये जाऊन कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली. यावेळी दोन्ही कर्णधारांनी एकत्र फोटो काढत एकमेकांना उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्याच्या शुभेच्छाही दिल्या.

अनिल कुंबळेंनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सध्या भारतीय क्रिकेटमधलं वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये उद्या टीम इंडिया कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे सामना सुरु होण्याआधी एक दिवस भारतीय संघाने हॉटेलबाहेर येऊन बीच व्हॉलीबॉलचा आनंदही लुटला. यावेळी विराट कोहलीचा शर्टलेस अवतार सगळ्यांचच लक्ष वेधत होता.
team-india-relax

या दौऱ्यात भारतीय संघ ५ वन-डे आणि १ टी-२० सामना खेळणार आहे. वेस्ट इंडिज संघाची सध्याची परिस्थिती पाहता भारतच विजेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, मात्र सध्या घडत असलेल्या प्रकाराचा भारतीय संघाच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेस्ट इंडिज सध्या आयसीसी क्रमवारीत ९ व्या स्थानावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडकात वेस्ट इंडिजचा संघ पात्र होऊ शकला नव्हता.

याउलट भारताच्या मागील वेस्ट इंडिज दौऱ्याच्या आठवणी चांगल्या आहेत. ४ कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली होती. प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांची ही पहिलीच मालिका होती. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्यात कोहलीची टीम इंडिया प्रशिक्षकाशिवाय कशी कामगिरी करतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.