आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी झालेले भारताचे २३ वर्षांखालील खेळाडू आगीच्या दुर्घटनेतून वाचले. सराव झाल्यानंतर हॉटेलवर जात असताना भारतीय खेळाडूंच्या बसमधून अचानक धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच भारताच्या वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टटाईन यांनी तत्परतेने बसचालकाला बस थांबविण्याचा आदेश दिला व खेळाडूंनाही त्यांनी बाहेर काढले.
त्यानंतर बराच वेळ खेळाडू व प्रशिक्षक रस्त्यावर थांबले. संघाचे प्रशिक्षक सॅव्हिओ मेदेरा यांच्यासह सहयोगींनी पोलिसांच्या वाहनांची वाट न पाहता पायीच हॉटेल गाठले. अखेर पोलिसांच्या वाहनातून खेळाडूंना हॉटेलवर सोडण्यात आले.
भारतीय संघाचे जनसंपर्क अधिकारी निलंजन दत्ता म्हणाले, ‘‘या दुर्घटनेबद्दल स्पर्धा संयोजकांनी दिलगिरीचे पत्र पाठविले असून आगीच्या कारणाबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही कोणतीही तक्रार नोंदविणार नाही.’’
मेदेरा म्हणाले, ‘‘गाडीतून धूर येऊ लागल्यानंतर सुरुवातीला नेमके काय घडले आहे हे आम्हाला लक्षात आले नाही. मात्र कॉन्स्टटाईन यांनी बसला आग लागली असल्याचे सांगितल्यानंतर आम्ही सर्व जण झटपट खाली उतरलो. येथील पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.’’
भारताची मंगळवारी येथे बांगलादेश संघाशी गाठ पडणार आहे.