धर्मशाला कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली. हिमाचलप्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात शनिवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीला प्रारंभ होणार आहे. या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सराव शिबीरातून वेळ काढून दलाई लामा यांची भेट घेतली. कसोटी सामना म्हटलं की तो पाच दिवस चालतो. त्यामुळे सामना रंगात आल्यानंतर खेळाडूंना रात्रीची झोप लागणं कठीण होऊन बसतं. नेहमी उद्याच्या दिवसाची चिंता लागून असते. अशावेळी शांत झोप कशी मिळवावी याचा सल्ला दलाई लामा यांनी क्रिकेटपटूंना दिला.

aussi_team
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंशी संवाद साधताना दलाई लामा

 

दलाई लामा यांची भेट घेऊन अतिशय आनंद झाला. त्यांनी दिलेले सल्ले आम्ही आमच्या दैनंदिन जिवनात लागू करू शकलो तर आनंदच होईल. मैदानात कितीही दबाव असला, खेळ कितीही त्रासाचा असला तरी शेवटी तुम्ही वैयक्तिक आयुष्यात किती सुखी आहात हे खूप महत्त्वाचे ठरते. अशावेळी तुम्हाला मनाची शांती लाभणं खूप गरजेचं असतं, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ म्हणाला.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम दलाई लामा यांच्या राहत्या घराच्या अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सरावातून वेळ काढून दलाई लामा यांची भेट घेणं सहज शक्य झालं. धर्मशालाच्या स्टेडियमवर यंदा पहिल्यांदाच कसोटी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.