ऐतिहासिक मालिका विजयाची न्यूझीलंडला संधी; धोनीसेनेपुढे प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

अभ्यंगस्नान आणि त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ मालिका विजयानिशी दिवाळी साजरी करणार की पराभवाने दिवाळे निघणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना शनिवारी होणार आहे. हा सामना जिंकून प्रतिष्ठा वाचवण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय सेना प्रयत्नशील असेल. दुसरीकडे न्यूझीलंडला भारतामध्ये यजमानांविरुद्ध पहिल्यांदाच मालिका विजयाची संधी असेल. हा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. या सामन्यावर पावसासह चक्रीवादळाचेही सावट असल्याचे म्हटले जात आहे.

भारताला आतापर्यंत या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आलेली नाही. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये कोहलीने शतक झळकावले आणि त्या वेळीच भारताला विजय मिळवता आला होता. पण ज्या दोन सामन्यांमध्ये कोहलीला जास्त धावा करता आल्या नाहीत त्या सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात साऱ्यांच्या नजरा कोहलीवर खिळलेल्या असतील. धोनी या मालिकेत चौथ्या स्थानावर फलंदाजीला येत असला तरी त्याला सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, हार्दिक पटेल, मनीष पांडे यांना फलंदाजीमध्ये सूर गवसलेला दिसत नाही. त्यामुळे एके काळी बलस्थान असलेली भारताची फलंदाजी बलाढय़ दिसत नाही. भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असेल. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातत्याने अचूक मारा करीत आहे. फिरकीपटू अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

न्यूझीलंडच्या संघाची दिवसेंदिवस कामगिरी चांगली होताना दिसत आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यासह सलामीवीर मार्टिन गप्तिलही फॉर्मात आला आहे, त्याचबरोबर रॉस टेलरलाही सूर सापडलेला दिसत आहे. गोलंदाजीमध्ये टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट हे सातत्यपूर्ण भेदक मारा करीत आहेत. त्याच्या जोडीला जेम्स नीशामही तिखट मारा करीत भारतीय फलंदाजांपुढे पेच निर्माण करीत आहे. फिरकीपटू मिचेल सँटनर हा या सामन्यातील लक्षवेधी खेळाडू असेल. पण अष्टपैलू कोरे अँडरसनला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. न्यूझीलंडचा मारा एवढा भेदक आहे की त्यांनी तीनशेच्या जवळपास धावा केल्या तर ते विजयाचे प्रबळ दावेदार ठरू शकतील.

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, अमित मिश्रा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, मार्टनि गप्तिल, रॉस टेलर, ल्यूक राँची (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोधी, जिमी नीशाम, कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अँटॉन डेव्हकिच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री

१९८८ आतापर्यंत न्यूझीलंडने भारतामध्ये एकही मालिका जिंकलेली नाही. १९८८ साली भारतामध्ये चार देशांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे जेतेपद न्यूझीलंडने पटकावले होते. त्यानंतर न्यूझीलंडला भारतामध्ये नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही.

जबाबदारी स्वीकारून प्रत्येक आव्हान पेलवणे महत्त्वाचे असते. आमच्यासमोर असलेले आव्हान यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संघाला विजयासाठी ज्या गोष्टींची गरज लागेल आणि त्यासाठी कर्णधार जे सांगेल, ते करणे आमचे काम आहे. त्यामुळेच मी काही सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा आमचा मानस आहे.

केदार जाधव, भारताचा फलंदाज